Just another WordPress site

“..हे लोक रामाचा वापर राजकीय टूलकिट म्हणून करत आहेत”-सुषमा अंधारे यांचे टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१ मार्च २४ शुक्रवार

ठाणे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला असून योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे राहतात असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा ठाण्यात पोहचली त्यावेळी सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केले आहे तसेच आपल्या भाषणात सुषमा अंधारे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली.देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राचा गुन्हेगारी दर वाढला आहे. सगळ्यात जास्त गुन्हेगारी दर हा ठाणे आणि कल्याणमध्ये आहे.मी हा आरोप माझ्या मनाने करत नाही.मला हे विविध जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वकिलांनी सांगितले आहे हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे.त्यादिवशी माझ्या सभेत माकड आले त्याची बातमीही झाल्याचे मी वाचले.मला कुणीतरी विचारले माकडांची भीती वाटते का ? मी त्यांना म्हटले माकड चाळे करणारे लोक आजूबाजूला असतांना मला कशाला माकडांची भीती वाटेल ? असे म्हणत सुषमा अंधारे यांनी ठाण्यात टोलेबाजी केली.

सध्या प्रभू श्रीरामाचा फार बोलबाला आहे मात्र प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते जे प्रभू श्रीरामांचे राजकीय टूलकिट करु पाहात आहेत त्यांना राम कळलेले नाहीत.त्यांना राम कळले असते तर मर्यादेचा गुण त्यांना कळला असता.भाजपा आणि शिंदेंच्या भक्तुल्यांनी मर्यादा नावाची गोष्टच ठेवलेली नाही.सगळ्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत.दिलेला शब्द हे लोक अजिबात पाळत नाहीत हे रोज स्पष्ट होत आहे.यावेळी सुषमा अंधारे यांनी मोदींची नक्कल केली.या लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना पक्षात घेतले आहे.प्रभू रामाचे खरे अनुयायी हे उद्धव ठाकरे आहेत.इतक्या गोष्टी घडून गेल्या तरीही त्यांनी मर्यादा सोडलेली नाही त्यांचा राज्यकारभार व्हाया गुवाहाटी आणि सुरत यांनी हिरावून घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सभागृहात आणि अमृता फडणवीस यांनी बाहेर हे सांगितले आहे.उद्धव ठाकरेंना राजकीय वनवासात पाठवले ते हेच वचन न पाळणाऱ्या लोकांनी असेही सुषमा अंधारे म्हणाल्या तसेच राहुल नार्वेकर यांच्यासारख्या १० पक्ष फिरून आलेल्या माणसाने आम्हाला निष्ठेचे प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही हे लोकांना आम्ही सांगितले.लोकही सध्या निवडणुकीची वाट बघत आहेत असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.आपल्या भाषणात राजन विचारे यांचा उच्चार २०२४ ते २०२९ चे खासदार असा केला आहे.निष्ठेने काम करणे हेच इथे असलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात आहे.निष्ठेने वागणाऱ्या प्रत्येकाने आमची यात्रा यशस्वी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी लावण्यापेक्षा अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केले जात होते त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली तसेच मराठा आणि ओबीसी अशी भांडणे लावू नका.समृद्धी महामार्गावर आजवर हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण ? त्याचीही एसआयटी चौकशी लावा.कालपर्यंत भाजपाने हिंदू-मुस्लीम दंगल लावण्याचा प्रयत्न केला.यांच्याकडे सगळे भक्तुल्ले आहेत.नेते यांनी केव्हाच संपवले.ज्या गोपीनाथ मुंडेंची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस फिरायचे त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.तुम्ही ओबीसींचेही नाहीत हे आम्हाला कळले आहे तसे असते तर विनोद तावडे,चंद्रशेखर बावनकुळे,पंकजा मुंडे यांचे राजकारण तुम्ही संपवले नसते.कधी काळी तुमच्या गळ्यातला ताईत असलेल्या आशिष शेलारांना साईडलाईन केले नसते.तुमच्या लाडक्या गँगमध्ये प्रसाद लाड आणि नवीन लोकांची भरती तुम्ही केली आहे असेही सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.

हिंदू आणि मुस्लीम अशी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला.मला आनंद वाटतो की मुस्लीम बांधवांनी दंगल घडू दिली नाही. भाजपाला जेव्हा हे समजले की हिंदू-मुस्लीम दंगल होऊ शकत नाही तेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा डाव रचला गेला.सगळे गुण्यागोविंदाने नांदत होते मात्र यांच्यात फूट पाडण्यात आली.एकीकडे खोटी शपथ घेणारे मुख्यमंत्री आहेत.शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्ही अधिसूचना मनोज जरांगेंच्या हाती देता व दुसरीकडे भुजबळ आणि पडळकर इशारे देतात हे सगळे एकाच सरकारमध्ये आहेत पण परस्परविरोधी विधाने करुन नुरा कुस्ती करत होते त्यामुळे हा वाद वाढला असाही आरोप सुषमा अंधारे यांनी केला म्हणूनच हे लोक रामाचा वापर राजकीय टूलकिट म्हणून करत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची एसआयटी लावत आहात,देवेंद्र फडणवीस यामागे तुम्ही शरद पवार आणि राजेश टोपे यांना लक्ष्य करत आहेत मात्र हे सगळे कहींपे निगाहे कहींपे निशाना असे आहे.तुमचा खरा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आहे हे आम्हाला माहीत आहे असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.