मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मार्च २४ सोमवार
अजित पवार यांनी जुलै २०२३ या महिन्यात महायुतीसह जात सत्तेत सहभागी होणे पसंत केले त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक आमदारही गेले व त्यांचे हे बंड यशस्वी ठरले आणि राष्ट्रवादीत फूट पडली.यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सामनामध्ये भाजपाच्या मांडीवर या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून अजित पवारांवर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.एवढेच नाही तर सुनेत्रा वहिनींनी देवेंद्र फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असेही म्हटले आहे.राज्य बँक घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते त्यांनी तो आत्मनिर्धारच केला होता.त्या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला.अजित पवारांविरोधात पोलिसांना काहीही ठोस सापडले नाही.अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यावर फडणवीस यांनी तांडव केले होते.महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा पवारांनी आणि त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नाही तर आपल्याकडे पुरावे असल्याचे ते सांगत होते व आता या पुराव्यांचे काय झाले ? हे पुरावे गिळून ढेकर दिला की आणखी काही केले ? भ्रष्टाचाऱ्यांना साथ देण्याची मोदी गॅरंटी फडणवीस यांनी अमलात आणली ती अशी.
फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील तर त्या आरोपांखाली फडणवीसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.पुराव्यांशी छेडछाड करणे हा अपराध आहे.पोलिसांनी पुरावा असतानाही कुणाच्या दबावामुळे अजित पवारांची शिखर बँक घोटाळा फाईल बंद केली असेल तर महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना पार्टी करुन हायकोर्टात दाद मागितली गेली पाहिजे.भ्रष्टाचार-भ्रष्टाचार असे ओरडत राहून जमिनीवर काठ्या आपटायच्या आणि माहौल निर्माण करायचा हे यांचे धंदे आहेत.तिसरा पर्याय म्हणजे समाजसेविका सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी,कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या सबबीखाली देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांवर अब्रू नुकसानीचा खटलाच चालवायाला हवा.कुणीही उठायचे आणि बदनामीचा चिखल उडवायचा हे बरे नाही असा उल्लेख सामनात करण्यात आला आहे.