रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ मार्च २४ मंगळवार
काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पनवेल दौऱ्यादरम्यान भाजपावर आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवारांवर कडाडून टीका केली.रायगड आणि मावळ हा मतदारसंघ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला त्यांची राजधानी अशा ठिकाणी आपला पवित्र भगवा फडकणार नाही तर मग दुसरे कुठले फडके फडकणार ? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपा,शिंदे गट आणि अजित पवार गटावर तुफान टीका केली तसेच मी पुन्हा येईन ? या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संदर्भत ठाकरी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला तर एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी गद्दारांचा नायक असा केला.आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, इथल्या खासदाराने गद्दारी केली आहे त्याला तर आडवा करायचाच पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत म्हणजे काय ज्यांचे सरकार येते त्यांच्याकडे जायचे.कुठेही गेले की आपले दुकान चालू.. म्हणजे राजकारणातली दुकानदारी करणारे आहेत त्यांची दुकाने बंद करायची आहेत.मी भाजपाबाबत म्हटले आहे की अब की बार भाजपा तडीपार ते करायचे आहे कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता.
एवढी फोडाफोडी केली तरीही कट्टर शिवसैनिक हे शिवसेनेबरोबरच आहेत त्यांना शिवसेनेने फक्त प्रेम दिले.माधवराव भिडे इथे आहेत.मी लहानपणापासून त्यांना पाहतोय.शिरीष बुटाला आहेत.बाळासाहेबानंतर इतकी वर्षे झाली पण त्यांनी शिवसेना सोडली नाही याला म्हणतात निष्ठा.हे जे काही गद्दार आहेत त्या गद्दारांचा नायक आहे त्यालाही विचारा तू दाढी खाजवत जरा आठव.. कारण आपण काही आठवायचे असेल तर डोके खाजवतो हा दाढी खाजवतो.स्वतःचीच दाढी तू स्वतःच खाजव खरेतर पैसे खूप आहेत दाढी खाजवायलाही माणसे ठेवली असतील तर माहीत नाही पण तुम्हाला मी काय दिले नव्हते ? शिवसेनेने देता येईल ते सगळे तुम्हाला दिले तरीही आमच्या पाठीत वार केला.शिवसेना ही ओळख तुमच्यासमोर आले म्हणून निवडून आलात.यांना वाटले की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच.आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल आता असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.
नरेंद्र मोदी म्हणत आहेत काँग्रेसने देशाला लुटले.कुणाच्या खात्यात किती पैसे आहेत काढा.भाजपाच्या खात्यात सहा ते सात हजार कोटी आहेत तर काँग्रेसच्या खात्यात किती आहेत ? ६०० ते ७०० कोटी आहेत.मग देशाला लुटले कुणी ? मोदी आणि भाजपानेच मागच्या दहा वर्षांत देश लुटला आहे.पीएम केअर फंडात किती पैसे ? हे कुणालाही माहीत नाही.करोना काळात तो फंड आला.भाजपाच्या लोकांनीही पीएम केअरला पैसे दिले.तो फंड खासगी असेल तर त्याचा बाप कोण ? उद्या इंडियाचा पंतप्रधान झाल्यावर आमच्या पंतप्रधानाला तो फंड विनियोग करता येईल की नाही ते भाजपाने सांगावे ?भाजपाने शिवसेना फोडली त्यानंतर मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला.चार दिवसात अजित पवार तिकडे.निर्मला सीतारमण यांनी श्वेतपत्रिका आणली त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला.लगेच अशोक चव्हाण तिकडे गेले हे सगळे जर पाहिले तर भाजपा हा पक्ष नाही तर सडकी,कुचकी वृत्ती आहे ही वृत्ती आपल्याला देशातून तडीपार करावी लागेल असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.