Just another WordPress site

“जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका”- शिंदे गटाचा भाजपाला इशारा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.७ मार्च २४ गुरुवार

महायुतीततल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून रस्सीखेच चालू असून जागावाटपाबाबत ज्या बातम्या आणि आकडेवारी (जागावाटपासंदर्भातील वेगवेगळे फॉर्म्युले) समोर येत आहेत त्यावरून शिवसनेच्या गोटात संतापाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी देखील भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केला आहे.अशातच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय असा आरोप शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केला आहे.कदम म्हणाले,भाजपाने केसाने गळा कापू नये अन्यथा माझे नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवावे.रामदास कदम म्हणाले,महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत,त्यांचे कान पकडले पाहिजेत.प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे परंतु जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका असे केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल याचे भान त्यांनी ठेवायला हवे.आपल्यातील संबंधांबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचे भान भाजपाच्या काही लोकांना असणे आवश्यक आहे.

शिंदे गटातील नेते म्हणाले,२००९ मध्ये आमची (संयुक्त शिवसेना) आणि भाजपाची युती असूनही भाजपाने मला गुहागरच्या विधानसभा निवडणुकीत पाडले हे वास्तव आहे.आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत.स्थानिक आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केली जात आहेत.स्थानिक आमदाराला त्रास देतायत हे सगळे हेतूपुरस्पर चालले आहे असे असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही याची भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.रामदास कदम म्हणाले,आम्ही (शिंदे गट) मोदी आणि शाहांकडे बघून इथे (एनडीए) आलो आहोत.मागील निवडणुकीत काय झाले याची मला माहिती नाही परंतु पुन्हा एकदा आमचा विश्वासघात झाला तर माझेही नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.