Just another WordPress site

“दिल्लीतील व्यापाऱ्यांची भांडी घासणे हेच बनावट शिवसेनेचे नशीब”-संजय राऊतांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.९ मार्च २४ शनिवार

“स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.अजित पवारांनीही अशीच भूमिका घेतली. पण आता त्यांना लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागत आहेत.डुप्लिकेट शिवसेनेचे नशीब हेच आहे.आम्ही स्वाभिमानाने २३ जागा लढत होतो आणि २३ जागा लढत राहू.पण जी डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांच्या वाट्याला पाच जागाही येत नाहीत.कुत्र्यापुढे हाडूक फेकावे अशा पाच जागा दिल्या आहेत.अजित पवारांची तर दोन-तीन जागांवर बोळवण केल्याचे दिसत आहे असा शब्दात उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन केल्याबद्दलही त्यांनी टीका केली.लोढा यांच्याहस्ते शिवसेना शाखेचे उदघाटन करावे लागते इतके वाईट दिवस शिवसेनेवर कधीही आले नव्हते.ज्या बिल्डरांनी त्यांच्या गृहसंकुलात मराठी माणसांना घुसण्याची परवानगी दिली नाही त्या बिल्डरांकडून फक्त डुप्लिकेट शिवेसेनेच्या शाखेचे उदघाटन होऊ शकते,स्वाभिमानी शिवसेनेचे नाही अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे.

जरांडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशीचे काय झाले ? असा प्रश्न संजय राऊत यांनी रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर उपस्थित केला.अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचे आरोप भाजपाने केले होते त्या आरोपांचे काय झाले ? अजित पवारांचे सर्व आरोप भाजपाबरोबर गेल्यामुळे धुतले गेले काय ? जे स्वाभिमानी लोक तुमच्याविरोधात लढत आहेत त्यांना त्रास देऊन तुम्ही लोकसभा निवडणूक जिंकू पाहत आहात पण संजय राऊत असो की रोहित पवार असो स्वतः शरद पवार असतील आम्ही तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाहीत.आम्ही लढू आणि एक दिवस येईल की त्यांनाच आमच्यासमोर गुडघे टेकावे लागतील असे संजय राऊत म्हणाले.संजय राऊत पुढे म्हणाले,आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबाला मी ओळखतो ते चुकीचे काम करू शकत नाहीत.रोहित पवारांची चौकशी करून त्यांचा वारंवार छळ केला जात आहे.रोहित पवारांनी काय गुन्हा केला ? त्यांचा उद्योग आहे त्यात काही गोष्टी वर-खाली झाल्या असतील म्हणून धाडी टाकून त्यांच्या मालमत्ता जप्त करून बदनाम करणे योग्य नाही.महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोघलशाहीसमोर न झुकण्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतल्यामुळेच त्यांचा छळ केला जात आहे.महाराष्ट्राचे लचके तोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.हे सुरू असतांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री शांत बसले आहेत.पण उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि शरद पवार यांच्यासारखे अनेक लोक त्यांच्याविरोधात ठामपणे उभे आहोत.

रोहित पवार यांच्यावरील कारवाई थांबवायची असेल तर त्यांनी काय करायला पाहीजे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. त्यांनी भाजपामध्ये जावे का ? पण रोहित पवार त्यांच्या आजोबांबरोबर ठामपणे उभे आहेत ते कुठेही जाणार नाही. तुम्हाला किती कारवाई करायची ती करा हा महाराष्ट्र लढत राहिल.रोहित पवार यांच्यासारखीच कारवाई अजित पवारांवर झाली त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपात गेले व त्यांच्यावरील कारवाई थांबली.प्रफुल पटेल यांच्यावरही इक्बाल मिर्ची प्रकरणी कारवाई झाली तेही भाजपात गेले.हसन मुश्रीफ,अशोक चव्हाण अशी अनेक नावे घेता येतील असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.