“पक्ष फोडणे म्हणजे हिंदुत्व नसून ही तुमची नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती आहे”
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपावर हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ मार्च २४ सोमवार
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी अखेर रविवारी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला यावेळी आपण विकासकामांसाठी शिंदे गटात आल्याचा दावा रवींद्र वायकर यांनी केला.या पार्श्वभूमीवर दुसरीकडे गोरेगावमध्ये झालेल्या एका सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांची चर्चा सुरू झाली आहे.उद्धव ठाकरेंनी गोरेगावमधील ठाकरे गटाच्या शाखेला भेट दिली यावेळी तिथे झालेल्या सभेत ते बोलत होते.त्यांनी शिंदे गटाबरोबरच भारतीय जनता पक्षावरही हल्लाबोल केला.शिवसैनिकांचे प्रेम खोक्यातून मिळत नसते.शिवसेनेच्या मुळावर कुणी घाव घालत असतांना हा शिवसैनिक गप्प बसेल का ? गद्दारांचे नशीब आहे की आज शिवसेनाप्रमुख नाहीयेत.नाहीतर यांची कधीच वाट लागली असती.मी थोडा संयमी आहे पण याचा अर्थ असा नाही की मी लढणारच नाही. पण तुम्हाला काढून टाकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे असे ते म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेल्याच्या विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी पाकिस्तानचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिले होते त्यावरही उद्धव ठाकरेंनी तोंडसुख घेतले असून “काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही.गुजरात आमचाच आहे पण देवेंद्रजी गुजरात म्हणजे पाकिस्तान नसेल तर मग महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का? असे उद्धव ठाकरे म्हणाले.हे फक्त पक्ष फोडतायत पण पक्ष फोडणे म्हणजे हिंदुत्व नसून ही तुमची नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती आहे कारण तुम्ही आजपर्यंत काहीच केले नाही.आजही माझे आव्हान आहे त्यांना की लोकसभेबरोबर महापालिका आणि विधानसभेचीही निवडणूक घ्या.एकदाच काय तो तुमचा खात्मा करून टाकतो.तुम्हालाही त्रास नाही आणि आम्हालाही त्रास नाही.वन नेशन,वन इलेक्शन घ्या.एकदाच काय तो तुमचा फडशा पाडून टाकतो.दोन वर्षं झाल्यानंतरही महापालिका निवडणुका घेण्याची यांची हिंमत नाहीय असे आव्हान यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिले.
दरम्यान कोस्टल रोड हे शिवसेनेचे स्वप्न होते असे उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले.कोस्टल रोड हे आपले शिवसेनेचे स्वप्न आहे ते आपण महापालिकेने पूर्ण केले आहे.त्यात मिंध्यांनी काहीही केलेले नाही.देवेंद्र फडणवीसांचे तर सोडूनच द्या आणि पंतप्रधानांचा तर त्याच्याशी दुरान्वयानेही संबंध नाही.आता त्याच्या अर्धवट रस्त्याचे उद्घाटन करत आहेत.एकच मार्गिका खुली करत आहेत.कशाला घाई करताय ? श्रेय घेण्यासाठी हे चालू आहे असे ते म्हणाले.मला भाडोत्री जनता पक्षाला सांगायचंय,आजपर्यंत तुम्ही आमची मैत्री पाहिली.आता जरा मशालीची धग बघा तुमच्या खुर्चीचे बुड कसे जाळून टाकते ती असे खोचक आव्हानही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.