झारखंड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ मार्च २४ बुधवार
झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता काँग्रेसच्या आमदारांचीही चौकशी केली जात असून काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद यांचीही ईडीद्वारे मनी लाँडरिंग प्रकरणी बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली.भाजपाचे तिकीट नाकारल्यामुळेच आपली चौकशी होत आहे असा आरोप अंबा प्रसाद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलतांना केला आहे.“भाजपाने मला लोकसभेचे तिकीट देऊ केले होते पण मी त्यासाठी नकार दिला त्यामुळे माझ्याविरोधात ही कारवाई केली जात आहे असा आरोप आमदार अंबा प्रसाद यांनी केला आहे.पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असतांना आमदार अंबा प्रसाद यांनी गंभीर आरोप केले आहेत.त्या म्हणाल्या,भल्या पहाटे ईडीचे अधिकारी माझ्या घरात शिरले व पूर्ण दिवसभर त्यांनी माझा छळ केला.अनेक तास त्यांनी मला एकेठिकाणी उभे ठेवले. मला भाजपाने हजारीबाग मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट देऊ केले होते पण मी ते नाकारले त्यानंतर माझ्यावर दबावही टाकम्यात आला.राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडूनही अनेक लोक येत होते,छत्रा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी असेही ते सांगत होते पण मी त्यावरही काही उत्तर दिले नाही.हजारीबाग मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे त्यामुळे कदाचित आमच्यावर दबाव टाकला जात असेल.आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे आमच्यावर कारवाई केली जात असावी असे त्यांनी नमूद केले आहे.
आमदार अंबा प्रसाद पुढे म्हणाल्या,हजारीबाग लोकसभेतून माझा विजय होईल अशा बातम्या माध्यमांनी चालविल्या आहेत त्यामुळेच भाजपाने मला उमेदवारी देऊ केली व ती नाकारल्यानंतरचे परिणाम मी भोगत आहे.मी अदाणींच्या विरोधात कोणताही मुद्दा उचलू नये अशी समज मला भाजपामधील नेते देत होते पण मी विषय मांडत राहिले त्याचे परिणाम म्हणून मला आता या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.ईडीकडून काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांच्या १७ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.हजारीबाग जिल्ह्यातील बरकागाव विधानसभेतील अंबा प्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी निगडित ठिकाणांवर या धाडी पडल्या आहेत.अंबा प्रसाद या झारखंड विधानसभेतील सर्वात तरूण आमदार आहेत.झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साव यांच्या त्या कन्या असून अंबा प्रसाद यांच्या मातोश्री निर्मला देवी यादेखील माजी आमदार आहेत.निर्मला देवी यांनी माध्यमांशी बोलत असतांना सांगतिले की,लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माझ्या मुलीचे खच्चीकरण करण्यासाठी ईडीकडून तिच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे.मी राजकारण सोडून आता बरेच वर्ष झाले आहेत,माझ्या मुलीलाही मी राजकारण सोडण्याचा सल्ला देईल असे निर्मला देवी यांनी म्हटले आहे.