Just another WordPress site

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

भाजपाकडून महाराष्ट्रातल्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट,नव्या चेहऱ्यांना संधी,मोदींचे धक्कातंत्र

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१४ मार्च २४ गुरुवार

निवडणूक आयोग लवकरच देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून वेगवेगळे पक्ष त्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर करू लागले आहेत.गेल्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती याद्वारे भाजपाने १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यापाठोपाठ भाजपाने आता त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे.भाजपाने पहिल्या यादीत महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला भाजपाच्या उमेदवारांची नावे जाणून घेण्याची उत्सुकता होती अशातच भाजपाने आज त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार हिना गावित यांना नंदुरबार,सुभाष भामरे-धुळे, स्मिता वाघ-जळगाव,रक्षा खडसे-रावेर,अनुप धोत्रे-अकोला,रामदास तडस-वर्धा,नितीन गडकरी-नागपूर,सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,प्रतापराव चिखलीकर-नांदेड,रावसाहेब दानवे-जालना,भारती पवार-दिंडोरी,कपिल पाटील-भिवंडी, पियूष गोयल-उत्तर मुंबई,मिहिर कोटेचा-मुंबई उत्तर पूर्व,मुरलीधर मोहोळ-पुणे,सुजय विखे पाटील-अहमदनगर,पंकजा मुंडे-बीड,सुधाकर श्रृंगारे-लातूर,रणजीत सिंह नाईक निंबाळकर-माढा आणि संजयकाका पाटील यांना सांगलीतून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

दरम्यान भाजपाने चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला असून भाजपाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे.बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.महाराष्ट्रातील २० उमेदवारांसह भाजपाने देशभरातील इतर राज्यांमधील ५२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत यामध्ये कर्नाटकमधील २० उमेदवार,मध्यप्रदेश पाच,त्रिपुरा एक,दादरा आणि नगर हवेलीमधील एक आणि तेलंगणा ६ असे उमेदवार जाहीर केले आहेत.

पुणे लोकसभेसाठी भाजपात मोठी स्पर्धा होती व या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपातील पाच ते सहा मोठे नेते प्रयत्न करत होते यापैकी मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपाने शिक्कामोर्तब केले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर,जगदीश मुळीक,माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यासह इतर काही नेते पुण्यातून लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत होते परंतु भाजपा पक्षश्रेष्ठींनी मोहोळ यांना संधी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.