जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१४ मार्च २४ गुरुवार

सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात असून भाजपने बुधवारी रावेर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी घोषित केल्याने रावेरसह यावल तालुक्यात उमेदवारीसाठी इच्छुक अमोल जावळे समर्थक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करुन आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली त्यात राज्यातील २० उमेदवार घोषित करण्यात आले.जिल्ह्यातील जळगाव व रावेर येथील जागांचे उमेदवार जाहीर केले त्यात रावेरसाठी खासदार रक्षा खडसे आणि जळगावसाठी माजी आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर केले.रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांना भाजपची उमेदवारी जाहीर होताच जळगाव,अमळनेरसह जिल्ह्यात जोरदार जल्लोष करण्यात आला.भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जयघोष करतानाच एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले.दरम्यान भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांना डावलून खासदार रक्षा खडसे यांना तिकिट दिल्याने नाराज होवुन संतप्त झालेल्या शेकडो पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.