संपूर्ण राज्यात मार्चचे धान्य वितरण करताना लाभार्थ्यांची ‘बायोमॅट्रीक’ ओळख पटवून या पिशव्यांचे वितरण केले जात आहे.प्राधान्य गट आणि अंत्योदय गटातील लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.शिधावाटप दुकानदारांना या पिशव्यांचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जिल्हा पुरवठा विभागाकडून पिशव्यांच्या वितरणावर लक्ष्य ठेवले जाणार असून वितरण योग्य प्रकारे होत आहे अथवा नाही याची पाहणी विशेष पथकांकडून केली जाणार असल्याचे शिधावाटप दुकानदारांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजपने प्रचार सुरू केल्याचा आरोप केला जात आहे.यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने गणेशोत्सव आणि दिवाळीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची छायाचित्रे असलेल्या पिशव्यांमधून ‘आनंदाचा शिधा’ वितरण करण्यात आला होता.आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मोदी सरकारची हमी’ असलेल्या पिशव्या घरोघरी पोहोचवण्याची दक्षता घेतली जात आहे.वितरित केल्या जाणाऱ्या पिशव्यांवर पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र,मोफत धान्य पुरवण्याची त्यांचा संदेश आणि त्याखाली त्यांची स्वाक्षरी आहे.