“भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते”-अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ मार्च २४ शुक्रवार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटक केली असून दिल्ली उच्च न्यायालायने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ईडीने तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली.त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एक्सवरून संताप व्यक्त केला आहे.शरद पवार पोस्टमध्ये म्हणाले,सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्यावर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा तीव्र निषेध करीत असून भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते.अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाई विरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती तसेच त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते.तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते परंतु प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणे टाळले त्यांना अटक होणार याची खात्री होती त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतु अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.
दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचे पथक चौकशीसाठी हजर झाले यानंतर ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले मात्र दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला.तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.दरम्यान ‘आप’च्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.आज रात्रीच या प्रकरणी सुनावणी घेऊन केजरीवाल यांची अटक टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,ते केजरीवाल यांना समन्स बजावण्यासाठी निवासस्थानी आले आहेत मात्र ईडीच्या पथकाकडे छापेमारी करण्यासाठीचे वॉरंट असून त्यांनी निवासस्थानाची तपासणी सुरू केली आहे.केजरीवाल यांची चौकशी सुरू केली जाऊ शकते.गेल्या वर्षभरात ईडीकडून केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आले आहे मात्र केजरीवाल यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नाही असे ईडी अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.