जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या सात्री गावात बोरी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात गावाचा शहराचा संपर्क कायम तुटलेलाच असतो.याचमुळे गेल्यावर्षी गावातील ११ वर्षीय आदिवासी बालिका आरुषीचा बळी गेला होता.तसेच बुधवारी दसऱ्याच्या दिवशी वेळेवर उपचार न मिळाल्याने झोळी करून नदीतून नेलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.उषाबाई रामलाल भिल्ल(वय ५३)असे या मृत महिलेचे नाव आहे.गावाला शहराशी जोडणारा पूल असला असता तर उषाबाईंचा जीव वाचला असताअसे ग्रामस्थांनी म्हटले आहे. दसऱ्याच्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता गावातील उषाबाई भिल्ल यांच्या छातीत कळा येऊ लागल्या त्यांना उलट्याही झाल्या मात्र अंधारात नदीतून जाणे केवळ अशक्य असल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी दिवस उजाडण्याची प्रतीक्षा केली.थोडे उजाडल्यावर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी नदी पार करायची होती.बैलगाडी पाण्यातून जाऊ शकत नव्हती.गावातील चार ते पाच लोकांनी एकत्र येऊन झोळीच्या सहाय्याने उषाबाईंना झोळीत बसवून नदी पार केली.मात्र ही सर्व कसरत करण्यात बराच कालावधी उलटला होता.उषाबाई यांना अमळनेरला ग्रामीण रुग्णालयात नेले.मात्र तोपर्यंत उषाबाई यांची प्राणज्योत मालवली होती.तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही.बोरी नदीवर पूल नसल्यानेच या गावाचा विकासदेखील खुंटलेला आहे.पावसाळ्यात बोरी नदीला पाणी असले की गावातून शहरात येणे अवघड होऊन बसते. या काळात कुणी आजारी झाले की त्याला उपचार मिळणे दुरापास्त होते.एकीकडे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होताना अमळनेर तालुक्यातील सात्रीत अजूनही पूल बांधण्याची साधी तसदीही प्रशासनाने घेतलेली नाही.यामुळे ग्रामस्थांचा शहरासोबतचा संबंध तुटला असून त्यांना कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नाही.किमान या घटनेनंतर तरी सरकारला जाग येऊन पूल बांधण्याची सद्बुद्धी सुचेल का?असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
अमळनेर नगरपालिकेत बोट आणून ठेवली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र ग्रामपंचायतीला प्रशासनाने बोट उपलब्ध असल्याचे कळवले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. १७ किमीवरून बोट आणि कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी दीड तासच्या वर कालावधी लागतो.रुग्णाला तेवढा वेळ कसे थोपविणार असादेखील प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.गेल्या वर्षी आरुषी नावाची ११ वर्षीय आदिवासी बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तरीही निष्ठूर प्रशासनाला जाग आली नाही.वर्षभर काहीही उपाययोजना केली नाही.त्यामुळेच वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.