जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अभिनेते गोविंदा यांच्याबद्दल एक विधान केले होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा जयंत पाटील यांना याबद्दल विचारण्यात आले त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की,मी चित्रपटसृष्टीत नसल्यामुळे गोविंदा हा माझ्यापेक्षा चांगला नट आहे त्यात प्रश्नच नाही पण तो जिंकून येणारा उमेदवार आहे का ? याबद्दल मी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.दरम्यान आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटानेही पत्रकार परिषद घेऊन जागावाटपावर भाष्य केले.अजित पवार गटाच्या वतीने शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सुनील तटकरे यांना याआधीच उमेदवारी जाहीर केली होती.आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातली परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.