आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्‍याचा दावा त्‍यांच्‍या समर्थकांकडून करण्‍यात आला असला तरी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्‍वकर्मा यांनी मात्र अद्याप अधिकृतरीत्‍या आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करण्‍यात आलेला नाही असे सांगितले आहे.पाठिंब्‍याविषयीचा निर्णय हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि पक्षाची कार्यकारिणी घेईल असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.वंचित बहुजन आघाडीने अमरावती मतदारसंघातून प्राजक्‍ता पिल्‍लेवान यांना यापूर्वीच उमेदवारी घोषित केली आहे. आनंदराज आंबेडकर हे गेल्‍या दोन वर्षांपासून सातत्‍याने अमरावतीचा दौरा करीत आहेत व आपण अमरावतीतून निवडणूक लढवावी अशी स्‍थानिक कार्यकर्त्‍यांची इच्‍छा होती असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.आनंदराज आंबेडकर यांच्‍या उमेदवारीमुळे मतदारसंघातील लढत ही वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.दरम्यान अमरावतीतून कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून उद्या बुधवारी प्रहार जनशक्‍ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब हे तर गुरुवारी ४ एप्रिल रोजी भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.