मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ एप्रिल २४ गुरुवार
मतदारसंघांच्या सर्वेक्षणांचे हवाले देत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या खासदारांचे तिकीट कापण्याच्या भाजपच्या खेळीमुळे शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे त्यातच हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मागे घेण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर बुधवारी ओढवली.हेमंत पाटील यांच्यासह यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली असून नाशिक,रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेवरूनही मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे याबद्दल शिवसेनेतील नाराजी तीव्र होऊ लागली आहे.दरम्यान हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.शिंदे यांच्या बंडादरम्यान अगदी पहिल्या दिवसापासून हेमंत पाटील त्यांच्याबरोबर होते मात्र पाटील यांच्या उमेदवारीस भाजपचा तीव्र विरोध होता.पाटील यांच्याऐवजी नवा उमेदवार द्या असा आग्रह भाजपने पहिल्या दिवसापासून धरला होता तरीही शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी प्रचारही सुरू केला होता असे असताना अचानक बुधवारी पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहाळीकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.हेमंत पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून तेथील शिंदेगटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनाही डच्चू मिळाल्याचे वृत्त आहे.गवळी यांच्याबद्दलची नाराजी व त्यांच्या विरोधात झालेले गैरव्यवहारांचे आरोप आणि ईडी चौकशी यातून गवळी यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती त्यामुळे गवळी यांना नाकारण्यात आल्याचे समजते.आतापर्यंत शिंदे यांच्याबरोबर आलेल्या तीन खासदारांचे तिकीट कापले गेले असून नाशिकचे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रम आहे.
भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा आधार देत हिंगोली, यवतमाळ, नाशिक, हातकणंगले येथील उमेदवार बदलण्याचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला टोलावून पाहीला. मात्र निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ येऊ लागल्याने अखेर भाजपच्या या दबावतंत्रापुढे शिंदे यांना झुकावे लागले. रामटेक येथील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना हटवून काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात तर भाजपच्या नेत्यांचा थेट सहभाग होता.ठाणे आणि कल्याण यापैकी एका मतदारसंघाची मागणी करणाऱ्या भाजपने येथेही सर्वेक्षणाचे आकडे पुढे केल्याचे समजते.ठाण्यातून संजीव नाईक यांना विजयाची संधी अधिक असल्याचा अहवाल भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला आहे.ठाण्याची जागा २५ वर्षांपासून शिवसेनेकडे असल्याने ही जागा आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे येथून शिवसेनेचे धनुष्यबाण दिल्लीपर्यत पोहचविण्याचे काम आनंद दिघे यांनी केले होते आणि त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्यावर ती जबाबदारी कायम आहे त्यामुळे ठाण्याची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी अशी भूमिका शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू यांनी गेले वर्षभर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे.सामंत यांनी मध्यंतरी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केला होता.महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत ही जागा शिवसेनेला म्हणजेच सामंत बंधूंसाठी सोडली जाईल असे चित्र दिसत असताना राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री शिंदेही अवाक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.राणे यांच्या आक्रमक भूमिकेमागे भाजपचे पाठबळ असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या नेत्यांकडून केल्या जात आहेत.