Just another WordPress site

“सीबीआय आणि ईडी आठ दिवस माझ्याकडे द्या..” खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य चर्चेत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.४ एप्रिल २४ गुरुवार

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचाराचा धुरळा उडाला आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रोज प्रसार माध्यमांशी चर्चा करत असतात त्यातून विविध प्रकारच्या बातम्याही मिळत असतात.आता त्यांनी आणखी एक वक्तव्य केले असून संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय यांच्याविषयी हे विधान केले आहे.तपास यंत्रणांचा गैरवापर मोदी सरकारने केला आहे असा आरोप कायमच केला जातो.संजय राऊत,उद्धव ठाकरे,शरद पवार या सगळ्यांकडूनच हा आरोप आत्तापर्यंत केला गेला आहे.आता संजय राऊत यांनी याचबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन नेते घाबरुन भाजपासह गेले.त्यांच्या जाण्याची कारणे त्यांच्या भीतीत,डरपोकपणात आहेत.सीबीआय,ईडी,प्राप्तिकर विभागाला घाबरुन हे तिकडे भाजपात गेले आहेत.भाजपाने यांना त्यांच्या वॉशिंग मशीन मधून स्वच्छ केले म्हणून त्यांची पाप काही धुवून निघणार नाहीत.एकनाथ शिंदे,अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेले आमदार आणि नेते का गेले ते सर्वांनाच माहीत आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले  आहे.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की राष्ट्रवादीच्या फुटीला मला कसे जबाबदार धरतात ? तो पक्ष शरद पवारांचा आहे.त्यानंतर शिवसेना त्यांचे मी सांगतो की हे सगळे घाबरुन गेले आहेत.कुणाचे तरी नाव घ्यायचे म्हणून माझे नाव वगैरे घेतले जाते.संजय निरुपम यांचा माझ्याबाबत बोलण्याचा काय संबंध ? त्यांनी त्यांच्या पक्षापुरते बोलावे.मी माझ्या पक्षाशी निष्ठा बाळगून आहे.मला कधीही पक्ष फोडावासा,बदलवासा वाटला नाही.जे फुटून गेलेत त्यांना वाटत असेल की संजय राऊतमुळे पक्ष व्यवस्थित सुरु आहे.त्या वैफल्यातून माझ्यावर आरोप केले जातात.मला आंतरराष्ट्रीय प्रवक्ते वगैरे म्हटले जाते.मला ते महत्त्व देत आहेत चांगली गोष्ट आहे असे संजय राऊत म्हणाले.इंडिया आघाडीचे सरकार आले तर तुम्हाला कुठले मंत्रिपद भुषवायला आवडेल ? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले,मी कधीही मंत्रिपदाचा विचार केलेला नाही.इतकी वर्षे मी दिल्लीत आहे मात्र मंत्रिपदाचा विचार केला नाही मात्र मला आठ दिवसांसाठी ईडी आणि सीबीआयचे नियंत्रण माझ्याकडे हवे आहे.आठ दिवस ईडी सीबीआय माझ्याकडे द्या,मला दाखवायचे आहे की या यंत्रणा कशा काम करतात असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.