“हा फक्त माझा एकटीचा विजय नाही तर माझ्याप्रमाणे संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलेचा विजय आहे”-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया
गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.४ एप्रिल २४ गुरुवार
भाजपाच्या नेत्या आणि अमरावतीच्या विद्यामान खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्राबाबत मोठा दिलासा दिला असून त्यांचे जातप्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे.अमरावतीतून त्या भाजपाच्या तिकिटावर पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.त्यांनी आजच उमेदवारी अर्जही दाखल केला व त्याच दिवशी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.अशात नवनीत राणा या भावूक झाल्याचे पाहण्यास मिळाले.“मागच्या १२ वर्षांपासून मी संघर्ष केला.विरोधकांनी मला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केला तसेच मला खूप त्रास दिला.माझ्यावर खालच्या पातळीवर टीका झाली.मी माजी सैनिकाची मुलगी आहे आणि एक महिला आहे मात्र कुठपर्यंत त्रास सहन करावा लागतो हे मी या सगळ्या कालावधीत पाहिले.मी राजकारणात आल्यापासून मला हे सगळे सहन करावे लागले.एका बाईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे किंवा तिच्या जातीच्या प्रमाणपत्रावर बोलायचे हे सगळेच घडले आहे असे नवनीत राणा म्हणाल्या.एका महिलेला कसा त्रास दिला जातो,तिचा मानसिक छळ कसा केला जातो हे मी अनुभवले मात्र सर्वोच्च न्यायालयाने मला न्याय दिला हा फक्त माझा एकटीचा विजय नाही तर माझ्याप्रमाणे संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलेचा विजय आहे.माझी मुले मला २०१३ पासून विचारायची की आई तू असे काय केले आहेस की तुला तुरुंगात जावे लागेल असे म्हटले जाते ?आज सर्वोच्च न्यायालयाने दूध का दूध आणि पानी का पानी केले आहे त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते असे नवनीत राणा म्हणाल्या आणि त्यांच्या डोळ्यात हे सांगताना पाणी आले होते व त्या प्रचंड भावूक झालेल्या पाहण्यास मिळाल्या.
माझ्या विरोधात २०१९ ला सगळे बोंब ठोकत होते की मी खोटी आहे,मी बनावट कागदपत्रे सादर केली आहेत.मी सगळ्यांना सांगत होते की माझ्यावर विश्वास ठेवा मी खरे बोलते आहे.माझ्या अमरावतीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला लोकसभेत पाठवले याचा मला आनंद आहे.माझे घर,माझी सासूरवाडी,माझे अमरावतीकर सगळ्यांनीच माझ्यावर विश्वास दाखवला.आज मी खासदारीला पुन्हा उभी राहते आहे आणि त्याच दिवशी हा निर्णय आला आहे याचा मला विशेष आनंद वाटतो आहे.अमरावतीकरही माझ्यासह जिंकले आहेत असे मला वाटते.मी संविधान पाळणारी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी आहे.महिलांना थांबवण्यासाठी बदनामी केली जाते.समाजात मान वर करुन जगू नये म्हणून खूप प्रयत्न विरोधकांनी केले पण देव ज्याच्या पाठिशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नसते तसेच आज झाले आहे असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.