मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ एप्रिल २४ शुक्रवार
लोकसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील सर्व सहा प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून अंतर्गत खदखद अनुभवास येत असून उमेदवारी नाकारण्यात आलेल्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावले असल्याने त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात हे नाराजीनाटय़ अधिक रंगल्याचे चित्र आहे.काँग्रेसमध्येही मतदारसंघ आणि उमेदवारी अस्वस्थता शमलेली नाही. याखेरीज राष्ट्रवादीचे दोन्ही गट,ठाकरे गट या पक्षांतही काही प्रमाणात नाराजी आहे.राज्यात पाचापैकी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली आहे.एरवी बहुतांश नेत्यांचा कल हा विधानसभा लढण्याकडे असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत फारशी चुरस बघायला मिळत नाही मात्र यंदा काहीसे वेगळे चित्र निर्माण झाल्याचे दिसते.महायुतीतील भाजप,शिंदे गट,अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस,ठाकरे गट,शरद पवार गट आणि अगदी वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारीवरून चुरस बघायला मिळत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भावना गवळी,कृपाल तुमाने आणि हेमंत पाटील या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आहे त्यामुळे हे नेते आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत.गवळी यांना उमेदवारी नाकारण्यामागे पालकमंत्री संजय राठोड असल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे.रामटेकमध्ये शिंदे गटाला काँग्रेसमधून उमेदवार आयात करावा लागल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे अद्याप उमेदवारीसाठी धडपडत आहेत व तेथेही पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे.वायव्य मुंबईतही उमेदवारवरून पक्षांतर्गत मतभेद आहेत.
उमेदवारी नाकारण्यात आल्याने जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटाची वाट धरली असून त्यांचे समर्थक करण पवार यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे.उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात उमेदवारीचा निर्णय होत नसल्याने विद्यमान खासदार पूनम महाजन अस्वस्थ आहेत.उत्तर मुंबईतून उमेदवारी नाकारण्यात आल्यावर गोपाळ शेट्टी यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती.औरंगाबाद मतदारसंघात तयारी करूनही अद्याप उमेदवारीचा निर्णय होत नसल्याने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड चिंतेत आहेत.रावेरमध्ये रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने इच्छूकांमध्ये नाराजी पसरली व त्यातून पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील इच्छुक राजेश विटेकर हे उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले आहेत अखेर अजित पवार यांनी विटेकर यांची समजूत काढली असून त्यांच्यावर मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे मात्र ते किती मनापासून काम करतील याची शंका आहे.शरद पवार गटात सातारा मतदारसंघावरून गोंधळ कायम आहे.विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लढण्यास नकार दिल्यानंतर त्यांचे पुत्र सारंग इच्छूक आहेत मात्र त्यांना पक्षातील इतर नेत्यांचा विरोध आहे.वाद टाळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गळ घातली असली तरी ते तुतारीच्या चिन्हावर लढण्यास तयार नाहीत.बीडमध्ये बजरंग सोनावणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने ज्योती मेटे यांनी अपक्ष लढविण्याची घोषणा केली आहे.नागपूर आणि रामटेकच्या उमेदवारांवरून काँग्रेसमध्ये खदखद बघायला मिळत आहे.नागपूरमध्ये आपल्याला उमेदवारी द्यायला पाहिजे होती असे माजी मंत्री नितीन राऊत उघडपणे सांगत आहेत.रामटेकमध्ये स्थानिक नेते नाराज आहेत.पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी त्यावर पक्षांतर्गत सहमती नाही.सांगली मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्याने संजय निरुपम यांनी पक्षाला गुरुवारी रामराम ठोकला.औरंगाबाद मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील संघर्ष उजेडात आला आहे.उमेदवारी नाकारण्यात आल्याने दानवे पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा होती मात्र दानवे यांनी त्याचा इन्कार केला आहे.