“वंचित आघाडीची भूमिका भाजपधार्जिणी”-काँग्रेसचे काँग्रेस नेते व माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचा आरोप
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ एप्रिल २४ शुक्रवार
महाविकास आघाडीशी फारकत घेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध आहेत असा आरोप करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांची भूमिकाच भाजपला अनुकूल आहे असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून तसेच वंचित आघाडीच्या प्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक दिली गेली नाही अशी टीका करीत प्रकाश आंबेडकर यांनी अखेर महाविकास आघाडीशी फारकत घेतली व त्यांनी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला व अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारही जाहीर केले.
मुणगेकर यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन वंचित आघाडीचीच भूमिक भाजपधार्जिणी आहे असे प्रत्युत्तर दिले असून लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे.डॉ.आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे असे डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले आहे.दरम्यान लोकसभा निवडणुकीत मतविभाजन होऊन भाजपचा फायदा होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्न केला मात्र वंचितकडून सातत्याने आपला अपमान केला,छळवणूक केली परंतु वैयक्तिक अपमानापेक्षा देशाचे संविधान व लोकशाही महत्त्वाचे आहे असे आपण मानतो अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या खंतजनक भावना व्यक्त केल्या आहेत.