नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ एप्रिल २४ शुक्रवार
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती व त्यांना स्वतःचे कोणतेही कुटुंब नाही तर आम्ही काय करू शकतो अशी उपाहासात्मक टीका केली होती.लालू प्रसाद यादव यांच्या टीकेनंतर अगदी कार्यकर्त्यांपासून तर केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांनी आपल्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ असे लिहिले आणि मोदींचे कुटुंब अशी एक मोहीम सुरू केली.भाजपा अनेकदा घराणेशाहीवरून काँग्रेसला लक्ष्य करत आला आहे परंतु बिहारमध्ये काही वेगळच चित्र दिसत आहे.घराणेशाहीच्या विरोधात असलेला पक्ष घराणेशाहीमध्ये अडकला असल्याचे चित्र आहे.भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहारमधील सर्व ४० लोकसभेच्या जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून या लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील राजकीय कुटुंबातील ११ सदस्यांना उमेदवारी दिली आहे.एनडीएच्या उमेदवारांची नावे जाहीर होताच आरजेडी नेत्यांनी पुन्हा पंतप्रधानांवर टीका केली.पक्षाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले,एनडीएकडून ११ घराणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत यावर पंतप्रधानांनी आपली प्रतिक्रिया द्यावी अशी आमची इच्छा आहे.ते पुढे म्हणाले,आमचे नेते लालू प्रसाद यांनी स्पष्टच सांगितले आहे की,जेव्हा वकिलाची मुले वकील होवू शकतात तेव्हा राजकारण्यांची मुलेदेखील राजकारणाची निवड करू शकतात.
बिहारमध्ये एनडीएने ११ राजकीय कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे त्यातील चार उमेदवार भाजपाचे आहेत.मधुबनीचे विद्यमान खासदार हुकूमदेव नारायण यादव यांचा मुलगा अशोक यादव यांना वडिलांच्या जागेवरच उमेदवारी देण्यात आली आहे.माजी खासदार मदन जैस्वाल यांचे पुत्र भाजपाचे माजी राज्यप्रमुख संजय जयस्वाल यांना पश्चिम चंपारण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.माजी खासदार राम नरेश सिंह यांचे पुत्र सुशील कुमार सिंह यांना औरंगाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे आणि माजी खासदार सी.पी.ठाकूर यांचा मुलगा विवेक ठाकूर यांना नवादामधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.भाजपाच्या एका नेत्याने हे देखील कबूल केले की,एनडीए घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका करू शकत नाही आपण आता सावध राहायला हवे असे ते म्हणाले.जेडी(यू) च्या यादीत माजी मंत्री वैद्यनाथ महतो यांचा मुलगा सुनील कुमार यांना वाल्मिकी नगरमधून,माजी खासदार आनंद मोहन यांच्या पत्नी लवली आनंद यांना शिवहरमधून आणि माजी आमदार रमेश कुशवाह यांच्या पत्नी विजयलक्ष्मी देवी यांना सिवानमधून उमेदवारी देण्यात आली आहे.जेडी(यू) च्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की,परिवारवादाचा मुद्दा आता फारसा महत्त्वाचा नाही.जे उमेदवार चांगले काम करणार नाही त्यांना नाकारले जाईल आणि जे पात्र असतील ते जिंकतील असे ते म्हणाले.
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) या यादीत पहिल्या स्थानावर आहे.लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चे पाच उमेदवार राजकीय कुटुंबातील आहेत.पक्षाचे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आहे ते त्यांच्या वडिलांचा बालेकिल्ला हाजीपूरमधून निवडणूक लढवणार आहेत त्यांचे मेहुणे अरुण भारती हे जमुईमधून निवडणूक लढवणार आहेत.बिहारचे माजी मंत्री अशोक कुमार चौधरी यांची कन्या आणि माजी काँग्रेस मंत्री महावीर चौधरी यांची नात शांभवी चौधरी यांना समस्तीपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे तर जेडी(यू) आमदार दिनेश सिंह यांच्या पत्नी वीणा देवी या वैशालीमधून निवडणूक लढवणार आहेत.चिराग यांनी सांगितले की, राजकारण्यांचे नातेवाईक असण्याचा अर्थ असा नाही की,एखाद्या व्यक्तीला राजकारणात संधीच दिली जाऊ नये शेवटी जनताच उमेदवारांचे भवितव्य ठरवते असे ते म्हणाले.बिहारमध्ये काँग्रेस आणि डाव्यांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीने आतापर्यंत जी नावे जाहीर केली त्यात पाच उमेदवार हे खासदार आणि आमदारांचे नातेवाईक आहेत.इंडिया आघाडीतील प्रमुख राजकीय कुटुंब म्हणजे यादव कुटुंब.लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या दोन मुलींना उमेदवारी दिली आहे.मीसा भारती या पाटलीपुत्रमधून निवडणूक लढवणार आहेत तर रोहिणी आचार्य या सारणमधून निवडणूक लढवणार आहेत.आगामी निवडणुकीत मिसा भारती जिंकून आल्यास हा त्यांचा तिसरा विजय असेल.आरजेडी उमेदवार माजी खासदार राजेश कुमार यांचा मुलगा कुमार सर्वजीत यांच्या नावाचादेखील यात समावेश आहे तर ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे पुत्र शंतनू बुंदेला यांना मधेपुरामधून उमेदवारी दिली जाऊ शकते असे सूत्रांनी सांगितले आहे.