“माझ्या संकटाच्या काळात मला शरद पवारांनी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे”-भाजपात परतणाऱ्या एकनाथ खडसेंचे विधान चर्चेत
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ एप्रिल २४ सोमवार
भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपात परतणार आहेत याबाबत त्यांनीच माध्यमांसमोर खुलासा केला असून भाजपा हे माझे घर असल्याने पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान त्यांनी शरद पवारांचेही आभार मानले आहेत.आज माध्यमांशी बोलतांना शरद पवारांचे आपल्यावर ऋण आहेत असे म्हटले आहे.एकनाथ खडसे म्हणाले,माझ्या संकटाच्या काळात मला शरद पवारांनी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे पण मी आता भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची मी भेट घेतली आणि भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे भाजपात मी प्रवेश करणार आहे आणि येत्या १५ दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे.चंद्रपूरच्या सभेत माझा प्रवेश नाही कारण माझा प्रवेश दिल्लीत होणार आहे. ज्या दिवशी तारीख मिळेल ज्या दिवशी मला बोलावणे येईल त्या दिवशी मी प्रवेश करेन असे एकनाथ खडसे म्हणाले.
भाजपाच्या जडणघडणीत माझे योगदान राहिले आहे असून गेले अनेक वर्षे मी या घरात राहिलो आहे व ४० वर्षे त्या घरात राहिल्याने पक्षाविषयी लगाव होता पण नाराजी असल्याने मी बाहेर पडलो परंतु आता नाराजीची तीव्रता कमी झाल्याने मी पुन्हा पक्षात येत आहे असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे.भारतीय जनता पक्षाशी ३० हून अधिक वर्षे एकनिष्ठ राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.पक्षांतर्गत वाद,भोसरी भूखंड घोटाळा,देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आले तेव्हापासूनच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली.बुथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या.दरम्यान गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय उलथापालथ झाली.शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुतीकडून रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली असून महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरायचा आहे.