“विकासाला आडवा जो कुणी येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.९ एप्रिल २४ मंगळवार
गुढी पाडव्याच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असून ठिकठिकाणी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ठाणे,डोंबिवली अशा ठिकाणी निघणाऱ्या शोभायात्रा या भागात प्रामुख्याने आकर्षणाचा विषय ठरतात.या शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते व चित्ररथ सहभागी होतात.तरुणाईचा मोठा जल्लोष या शोभायात्रांमधून पाहायला मिळतो.यंदाच्या वर्षीही शोभायात्रांमध्ये तोच उत्साह दिसत असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतानाच विरोधी पक्षांवर खोचक टीका केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी जनतेला गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.“नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा.हा पाडवा सगळ्यांना सुखा-समाधानाचा आणि समृद्धीचा जावो.आज महाराष्ट्रात सगळीकडेच पाडव्यानिमित्त जल्लोषात शोभायात्रा निघाल्या आहेत.आपली मराठी संस्कृती,परंपरा टिकवण्याचे काम अशा शोभायात्रांमधून होत असते.इथे अनेक संस्था त्यांचे चित्ररथ सहभागी होतात यातून समाजाला एक संदेश दिला जातो” असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आजचा दिवस प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेला विजय आपण पाडवा म्हणून साजरा करतो.देशभरात अशा प्रकारचा उत्साह पाहतोय.४ जूनला आम्ही विजयाचा गुढीपाडवाही आम्ही साजरा करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर टीका केली.गेल्यावेळी सरकार स्थापन होण्यापूर्वी आधीच्या सरकारमध्ये अडीच वर्षांत सर्व सण-उत्सव बंद होते पण आपले सरकार आल्यानंतर सणांवर असणारी बंदी आपण उठवली.लोक मोकळा श्वास घेऊ लागले.आम्ही सणांप्रमाणेच विकासावरचीही बंधने काढली असे एकनाथ शिंदे म्हणाले.हे सरकार सर्वसामान्यांचे असून प्रगती आणि विकासाला आडवा जो कुणी येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढी पाडवा साजरा करतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला आहे.