प्रहार पक्ष महायुतीबरोबर की विरोधात ? “आमचे बंड हे केवळ अमरावतीपूरते मर्यादित”-बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० एप्रिल २४ बुधवार
प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू यांनी महायुतीत बंडखोरी करत अमरावतीत भाजपाच्या नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला आहे.महत्त्वाचे म्हणजे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार न देता केवळ अमरावतीत उमेदवार दिल्याने बच्चू कडू हे महायुतीबरोबर आहेत कि विरोधात ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.दरम्यान यासंदर्भात आता बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले असून त्यांनी अमरावतीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब कोणत्याही परिस्थिती निवडून येतील अशा विश्वासदेखील व्यक्त केला आहे.टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.अमरावतीत आम्ही महायुतीच्या विरोधात लढतो आहे.आम्ही एकप्रकारे बंड केले आहे त्यामुळे आता आम्हाला महायुतीत ठेवायचे की नाही हा त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे ते जो निर्णय घेतली आम्ही त्याचे स्वागत करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे तसेच आमचे बंड हे केवळ अमरावतीपूरते मर्यादित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवनीत राणा यांना नेमका विरोध का आहे ? यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली असून राणा दाम्पत्याला विरोध करण्यामागे दोन तीन कारणे आहेत.एक म्हणजे रवी राणा हे नेहमी मारण्याची भाषा करतात.धमक्या देतात व त्यांनी मला देखील घरी येऊन मारण्याची धमकी दिली होती. अमरावती जिल्ह्याचे वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न सातत्याने रवी राणा यांच्याकडून केला जातो.याशिवाय नवनीत राणा या पाच वर्ष खासदार होत्या मात्र पाच वर्षात त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत.या जिल्ह्याला खासदार आहे की नाही हेच जनतेला माहिती नव्हते कारण त्या अमरावतीत कधी दिसल्या नाहीत त्यामुळे अमरावतीच्या जनतेमध्ये त्यांच्या विरोध रोष होता आणि जनतेने त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याची मागणी केली होती असे ते म्हणाले.दिनेश बुब यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून संपर्क करण्यात आला का ? असे विचारले असता त्यांच्याकडून कोणताही संपर्क साधण्यात आला नाही असे बच्चू कडू यांनी सांगितले.तसेच आता निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ गेली आहे.साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी आम्ही उमेदवारी मागे घेणार नाही असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मोदींसाठी नवनीत राणा यांना निवडून द्या असे आवाहन केले होते.यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षासाठी मोदी महत्त्वाचे असतील तर आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे.देशातील गरीब जनता महत्त्वाची आहे.देशातील बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे.पेपर फुटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे आम्ही ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत.दरम्यान यावेळी बोलताना अमरावतीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तसेच दिनेश बुब एक सच्चा कार्यकर्ता आहे.एक रक्तदाता आणि एक समाजसेवक आहे असेही ते म्हणाले.