“सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात !! हिंदुंना भाजपच फसवतेय !!” ॲड.प्रकाश आंबेडकर यांची टीका
अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
सीएए आणि एनआरसी कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे भाजपने चित्र उभे केले मात्र सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात आहे.भाजप हिंदुंना फसवत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला. लोकसभा निवडणुकीतील पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सीएए आणि एनआरसी यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे व ते पूर्णपणे असंविधानिक असून हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे म्हणले जात असले तरी त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजावर होणार आहे.व्हीजेएनटीला त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.२० टक्के हिंदू समाजाच्या विरोधात कायदा आहे असा आरोप ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचितच्या जाहीरनाम्यात ते स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कंत्राटी कामगाराची सेवानिवृत्ती ५८ वर्षांपर्यंत,शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा व त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा,शिक्षणासाठी सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र भूमिका घेणार,शिक्षणासाठी ९ टक्क्यांपर्यंत तरतूद,नवीन औद्योगिक धोरण राबविणार,शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य,कापसाचा प्रतिक्विंटल किमान नऊ हजार दर आणि सोयाबीनला ५ ते ६ हजार भाव,शेतीला औद्योगिक दर्जा,ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळावे,एस.सी व एस.टी यांच्या आरक्षणासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणार आदी मुद्द्यांचा समावेश असलेला सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध करीत असल्याचे ॲड.आंबेडकर म्हणाले.पत्रकार परिषदेला पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन पुंडकर,समाज माध्यम प्रमुख जितरत्न पटाईत,मिलिंद इंगळे,ॲड.नरेंद्र बेलसरे,सचिन शिराळे,पराग गवई आदी उपस्थित होते.समान नागरी कायदा हा संविधानाला धोका नाही मात्र हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धोका आहे व या कायद्यामुळे आमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांचा तोटा होणार नाही तर धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या पक्षांना त्याचा फटका बसेल.विशेषतः भाजप,संघ आणि बजरंग दल यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होणार असल्याचा टोला ॲड.आंबेडकर यांनी लगावला आहे.