मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१९ एप्रिल २४ शुक्रवार

वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे संजयकुमार वाघमारे यांनी गुरूवारी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून काल शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.कालपर्यंत १५ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले असून ६९ उमेदवारांनी आजवर १५५ उमेदवारी अर्जांची खरेदी केली आहे.दि.१२ एप्रिल शुक्रवार पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात झाली असून १५ एप्रिल रोजी मागील निवडणुकीत वंचितकडून उमेदवार राहिलेले अर्जून सलगर यांच्यासह नवनाथ दुधाळ आणि आर्यनराजे शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.१६ एप्रिल रोजी महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील,महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मनोहर आनंद पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता तर गुरूवार १८ एप्रिल रोजी दिवसभरात नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत.

यात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर,बहुजन समाज पार्टीचे संजयकुमार वाघमारे यांचा समावेश आहे तर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही गुरूवारी आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.या व्यतिरिक्त शायनी नवनाथ जाधव,नितेश शिवाजी पवार,रहिमोद्दीन काझी,ज्ञानेश्वर नवनाथ कोळी,उमाजी गायकवाड आदींनी उमेदवारी दाखल केली आहे.काल शुक्रवार १९ एप्रिल उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता तर २० एप्रिल रोजी छाननी व २२ एप्रिल उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे.