“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे काम संपले असून ते पुढच्या दोन महिन्यांत दिसणार नाहीत !!” प्रकाश आंबेडकरांचा दावा
हिंगोली-पोलिस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० एप्रिल २४ शनिवार
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात.आता त्यांनी मोदींवर टीका करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत खळबळजनक दावा केला आहे.एकनाथ शिंदेंचे काम आता संपले आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोली या ठिकाणी डॉ.बी.डी.चव्हाण यांची प्रचारसभा घेतली या प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.नरेंद्र मोदी २०२४ ला पुन्हा सत्तेत आले तर आता निवडणूक होणार नाही.देशाचा चेहरामोहरा पूर्ण बदलून जाईल व जो ऐकणार नाही त्याला तुरुंगात डांबतील.मोदी सत्तेत आल्यास सीएए आणि एनआरसी लागू करतील.बाबासाहेब आंबेडकर आले तरीही संविधान बदलू शकणार नाहीत अशी ग्वाही दिली जाते आहे मात्र मोदी सत्तेत आल्यास ते घटना बदलल्याशिवाय राहणार नाही हे बदलायचे असेल तर मोदींच्या विरोधात मतदान करा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम संपले असून लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणारही नाहीत.एकनाथ शिंदेंचा म्हणावा तसा फायदा लोकसभेला दिसला नाही तर वेगळे चित्र दिसू शकते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.प्रकाश आंबेडकर म्हणाले की,१७ लाख कुटुंबांनी देश सोडला आहे व हे लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाहीत तर हिंदू आहेत व त्यांची मालमत्ता ५० कोटी आहे.मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतो की तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना मते द्यायला सांगत आहात तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.