“फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठीचे वचन दिले होते”!! अमित शाह व भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नसल्याचा उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० एप्रिल २४ शनिवार
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना आणि भाजपाचे नेमके बंद दरवाजाआड काय ठरले होते ? याविषयी अनेक दावे करण्यात आले.अजूनही अमित शाह व उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यावेळी नेमके काय ठरले होते ? याविषयी परस्परविरोधी दावे केले जात आहेत त्यानंतर शिवसेनेचे भाजपाशी फाटले आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला.पुढचा राजकीय इतिहास सर्वश्रुत असून आता पुन्हा एकदा देशात आणि महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा ज्वर चढू लागला असून या पार्श्वभूमीवर पुन्हा एकद एकमेकांच्या केलेल्या कथित फसवणुकीबाबत दावे केले जात आहेत त्यातच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन मोठा दावा केला आहे.‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले असून यामध्ये त्यांनी अमित शाह व भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.पण यावेळी मात्र त्यांनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख करून मोठा दावा केला आहे.देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्याचे वचन दिले होते असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत त्यामुळे या मुद्द्यावरून नव्याने राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील अनैसर्गिक आघाड्या व युतीबाबत विचारणा केली असता त्यासाठी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्ष व अमित शाह यांना जबाबदार धरले आहे.“हे सगळे कुठे सुरू झाले ? लोकांना हे माहिती आहे.आम्ही हिंदुत्व व राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षासोबत होतो.भाजपाने आमच्याबरोबर हे का केले ?माझ्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की तुम्ही देश सांभाळा,आम्ही राज्य बघतो.चांगले चालले होते.माझ्या वडिलांचे २०१२ मध्ये निधन झाले तेव्हा मोदी आमच्या घरी आले होते.२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले असे उद्धव ठाकरे म्हणाले.“अमित शाह पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर मात्र त्यांची चालच बदलली.२०१४ च्या निवडणुकीआधी अमित शाहांनी विचारले तुम्ही सर्व्हे केला आहे का ? मी म्हटले आम्ही लढणारी माणसे आहोत आम्ही सर्वे करत नाही. शिवाजी महाराजांनी सर्व्हे केला नव्हता.जर सर्वेमध्ये असे दिसले की तुमचा पराभव होणार आहे तर तुम्ही लढणंच सोडून देता का ?” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सुरुवातीला प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे,नितीन गडकरी असे भाजपाचे नेते आमच्याशी वाटाघाटी करण्यासाठी येत असत तेव्हा आमच्यात जागांसाठी चढाओढ व्हायची पण आता त्यांनी उर्मटपणा व आकड्यांचा वापर सुरू केला आहे.त्यांनी राजस्थानमधले भाजपा नेते ओम माथूर यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवले.भाजपाला असे वाटले की आता बाळासाहेब हयात नाहीत तर हल्ला करायची हीच वेळ आहे.वापरा आणि फेकून द्या ही त्यांची गॅरंटी आहे तेच त्यांनी २०१९ मध्ये माझ्याबाबत केले असा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंबाबत आश्वस्त केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला.मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल.अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना व भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे अमित शाहांसोबतच्या चर्चेत ठरले होते.देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की ते माझा मुलगा आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि ते स्वत: दिल्लीत जातील पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.मला भाजपाचा असा एक मित्रपक्ष सांगा जो आनंदी आहे.आज एनडीएमध्ये फक्त अस्ताव्यस्त झालेले लोक आहेत.ते स्वत:च्या नेत्यांच्या बाबतीतही हेच करतात अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत केली आहे.