“साहेबांनी (शरद पवार) मला सर्वांना एकत्र येऊन काम करण्यास सांगितले तर… विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार ? ” अजित पवार स्पष्टोक्ती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ एप्रिल २४ सोमवार
जून २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला व अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत वेगळा गट बनवला तसेच या गटासह ते महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले.त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा केला व त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटातला हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला.निवडणूक आयोगाने मूळ पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह (घड्याळ) अजित पवार गटाला बहाल केले असून शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष असे नाव देण्यात आले आहे.तसेच शरद पवारांच्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे निवडणूक चिन्ह देखील देण्यात आले आहे.दरम्यान पवार कुटुंबाचे राजकीय विरोधक सातत्याने दावा करत आहेत की शरद पवार आणि अजित पवार आगामी काळात एकत्र येऊ शकतात यावर अजित पवार यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण होऊ द्या तोवर मला या विषयावर काहीच बोलायचे नाही कारण माझ्याकडे वेगळ्या प्रकारचा प्रचार चालला आहे.काही लोकांना बुचकाळ्यात टाकण्याकरता आमचे विरोधक वेगवेगळे दावे करत आहेत व हे लोक (आम्ही) पुढे एकत्रच येणार असल्याच्या बाता मारतायत म्हणूनच मला माझ्या मतदारांना,कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना सांगायचे आहे की,मी माझी भूमिका स्वीकारली आहे.मी जी भूमिका घेतली आहे तीच कायम राहील.मी माझ्या भूमिकेशी एकनिष्ठ आहे त्यामुळे मला वाटते की,लोकांनी मला साथ द्यावी.वडिलधाऱ्यांनी (शरद पवार) मला आशीर्वाद द्यावे.मतदारांनी भरभक्कम पाठिंबा द्यावा त्याचबरोबर त्यांनी कुठल्याही भावनिक प्रचाराला बळी पडू नये अजित पवार यांनी एबीपी माझा आणि मुंबई तकशी बातचीत करताना शरद पवारांबरोबर एकत्र येण्याच्या चर्चेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता की,आता लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे (अजित पवार गट महायुतीबरोबर आणि शरद पवार गट महाविकास आघाडीबरोबर) लढत असलात तरी पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही एकत्र येणार का ? तुम्ही अनेकदा राजकारणातल्या तडजोडींबाबत बोलता त्यामुळे आगामी काळात तुमच्याकडून आणखी काही तडजोडी पाहायला मिळू शकतात का ? यावर अजित पवार म्हणाले,साहेबांनी (शरद पवार) मला सर्वांना एकत्र येऊन काम करण्यास सांगितले तर…साहेब मला भरपूर वर्षांपासून काम करताना पाहत आहेत.ते मला म्हणाले की पुढे तुम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करा… आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले तर कदाचित…आजही त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांनी तसा विचार केला आहे.मागील वेळेस सर्वांनी अशा निर्णयावर सह्यादेखील केल्या होत्या.आम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर जायचे ठरवले होते.आता ते लोक काहीही बोलत असले तरी मागे ते लोक सत्ताधाऱ्यांबरोबर जाण्यास तयार होते.