“पोलिसच भाजपाचे कार्यकर्ते ? आता आमच्या हक्कासाठी आम्ही विष प्यावे का ?” बच्चू कडू यांचा उद्विग्न सवाल
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ एप्रिल २४ मंगळवार
अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानाला अवघे तीन दिवस आणि प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस उरले असतांना अमरावतीमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे.अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानात प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी सभा घेण्यास निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली होती.मात्र २४ एप्रिल रोजी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह याच मैदानावर प्रचार सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना आज मैदानाचा ताबा घेण्यासापासून पोलिसांनी मज्जाव केला.आपल्याकडे रितसर परवानगी असूनही पोलीस आपली अडवणूक करत असल्याचा आरोप करून बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन करत पोलीस भाजपाधार्जिण निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे.बच्चू कडू आज मंडप उभारण्यासाठी सायन्स कोर मैदानावर पोहोचले असतांना पोलिसांनी त्यांना रोखले तसेच सुरक्षेच्या कारणास्ताव तुम्हाला मैदानावर सभा घेता येणार नाही असे सांगितले.मात्र परवानगी आणि रितसर शुल्क भरल्यानंतर पोलीस आम्हाला कसे काय रोखू शकतात ? असा आरोप बच्चू कडू यांनी केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तरी विनापरवानगी सभा घेणे आवडणार आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तसेच पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमच्याशी वागत असून आम्हाला मैदानाबाहेर काढत आहेत.अमित शाह यांच्या सभेसाठी रितसर परवानगी मिळाली आहे का ? याचेही उत्तर पोलिसांनी दिलेले नाही असा आरोप त्यांनी केला.तसेच पोलिसांनी आता भाजपाचे मफलर (विदर्भीय भाषेत ते दुपट्टा म्हणाले) गळ्यात घालावे आणि आपल्या गाडीला भाजपाचा झेंडावा लावावा असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले असून आम्ही अमित शाह यांच्या सभेला विरोध करत नाहीत त्यांचे अमरावतीमध्ये स्वागतच आहे पण आमच्या हक्काचे हिसकावून त्यांना का देण्यात येत आहे ? एकप्रकारे आम्हाला स्वतःच्या घरातून बाहेर काढण्याचा हा प्रकार आहे तसेच पोलीस आता आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहे.आमच्या हक्कासाठी आता आम्ही विष प्यावे का ? असा उद्विग्न सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.२४ एप्रिल रोजी सायन्स कोर मैदानावर प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवार दिनेश बुब यांच्यासाठी प्रचार सभा होणार असल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते गावागावातून निघाले आहेत व ते उद्यापर्यंत याठिकाणी येतील.यामध्ये अनेक दिव्यांग कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.त्या सर्वांसह आम्ही याच मैदानावर धडकणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.