यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ एप्रिल २४ बुधवार
तालुक्यातील दहिगाव येथील पटेल वाडा परिसरात राहणारे पटेल कुटुंबीयांच्या घराला अचानक आग लागल्याने जिवनावश्यक वस्तुंसह सुमारे १ लाख २५ हजार रुपयाचे अंदाजे नुकसान झाले असून या घटनेचा शासकीय पंचनामा करण्यात आला आहे तर आगग्रस्त कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील दहिगाव येथील मनोहर मासुम पटेल यांच्या घरास काल दि.२३ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली असता गावकऱ्यांच्या सहकार्याने आग विझविण्यास यश आले आहे.सदर आगीची माहिती मिळताच तलाठी हेमंत मारोडे यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला.यात चांदीचे दागिने,नऊ घरावरील पत्रे,ज्वारी,गहू,तांदूळ,दाळ,कपडे,फ्रीज,कुलर,पलंग,गादी,पंखा यांच्यासह संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून १ लाख १५ हजार रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.दरम्यान मनोहर पटेल यांच्या बंद घराला आग कशी लागली ? हा विषय संपुर्ण गावात चर्चेला जात आहे.घरमालकास घराच्या मागील दरवाज्याचे बिजागरे तुटलेल्या अवस्थेत दिसून आले असल्यामुळे हा प्रकार कोणीतरी केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान कपाटातील नवे कपडे,चांदीचे दाग दागिने व पंखा पूर्ण जळून खाक झाले आहेत.यावेळी घरातून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या गावकऱ्यांनी धाव घेत आग त्वरित विझवण्यास मदत केली अन्यथा मोठा अनुचित प्रकार घडला असता असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.घटनास्थळी सरपंच अजय अडकमोल,ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी यांचे लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या.मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या पटेल कुटुंबियांचे घराला लागलेल्या आगमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असुन नुकसानग्रस्त कुटूंबास तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.