नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ एप्रिल २४ बुधवार
देशात काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या वाट्याची संपत्ती,हिंदू महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र जास्त मुलांना जन्म घालणाऱ्यांना दिली जातील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात.मात्र मंगळसूत्राचे महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागले ? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.देशाचे पंतप्रधान विकास,बेरोजगारी,महागाई या मुद्द्यांवर काहीच बोलत नाहीत.ते कशावर बोलतात ? तर मांस कोण खात आहे ? मच्छी कोण खात आहे ? कोणाला किती मुले होणार ? या विषयांवर ते बोलतात असे उद्धव ठाकरे म्हणाले.भाजपाचे नेते म्हणतात गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मोदींचा फोटो लावून निवडून आले.या निवडणुकीत गद्दार सेनेच्या उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी मोदींचा फोटो का वापरला जात नाही ? कारण मोदींचे नाव महाराष्ट्रात चालत नाही.त्यांचे नाणे महाराष्ट्रात चालेनासे झाले आहे.अमित शाह यांचा तर महाराष्ट्राशी काडीचा संबंध नाही.अमित शाह इकडे येऊन फणा काढतात व मणिपूरमध्ये जाऊन शेपूट घालतात अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
पंतप्रधान मोदी कायम ‘मेरा परिवार,मेरा परिवार’ म्हणत असतात पण मोदींनी किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली ? परिवारातील लोक बेरोजगार बसले आहेत,भीक मागत आहेत मग नुसते ‘मेरा परिवार’ बोलून काय फायदा ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.आता या सरकारची मस्ती तुम्हाला घालवावी लागेल.निवडणूक आयोग हा भाजपाचा घरगडी आहे.निवडणूक आयोग म्हणते ‘जय भवानी’ हा शब्द काढा. हा शब्द काढून प्रचारगीतात मोदींचे नाव टाकू का ? तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचे आहे हे ठीक आहे पण दैवतावरही तुमचा आकस आहे. यंदाच्या निवडणुकीत आपल्याला नांदेडमधील चिखल साफ करायचा आहे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.