नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ एप्रिल २४ गुरुवार
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याने शेतातील आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे.ही घटना नांदेड जिल्ह्यातील कळकावाडी ता.कंधार येथे मंगळवारी दि.२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून नामदेव उद्धव केंद्रे वय २१ व कोमल नामदेव केंद्रे वय १९ असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.या नवदाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे यांचा विवाह शेल्लाळी येथील किशन गित्ते यांची मुलगी शाहु (कोमल) हिच्याशी कळकावाडी येथे १७ फेब्रुवारी रोजी झाला.दोघांच्याही संसाराला चांगली सुरुवात झाली होती.दरम्यान दि.२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नामदवे व कोमल हे दोघे कळकावाडी येथील आपल्या शेतात गेले होते.याठिकाणी घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याचे काल दि.२४ एप्रिल बुधवार रोजी सकाळी समोर आले.
या घटनेची माहिती मिळताच कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव,सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे,बीट जमादार गित्ते,पोलीस कॉन्स्टेबल जुन्ने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दोन्ही मृतदेहावर कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत नामदेवचे वडील उद्धव केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे हे करत आहेत.