नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार
नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू असतांना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मात्र व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशिन कुर्हाडीने फोडल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
रामतीर्थ येथील ३ नंबर वार्ड येथे सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली व दुपारी ४ वाजेपर्यंत ३७९ पैकी १८५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.दरम्यान मतदान सुरू असतांनाच गावातील तरुण भैय्यासाहेब आनंदराव एडके वय २५ हा कुर्हाड घेऊन थेट मतदान केंद्रात घुसला आणि त्याने कुर्हाडीने व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशिन फोडण्यास सुरुवात केली.त्याने मी एम.ए.झालो असून बेरोजगार आहे,मला नोकरी मिळत नाही असे तो म्हणत होता.त्याच्या हातात कुर्हाड दिसताच मतदान केंद्रप्रमुख सुबोध थोरात आणि अन्य कर्मचारी प्रचंड घाबरले होते मात्र पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले आहे.इव्हीएम मशिन कुर्हाडीच्या घावाने फुटली असली तरी व्हीव्हीपॅट मशिन मात्र सुरू असल्याचे सांगण्यात आले तसेच केंद्रप्रमुखाकडे असलेल्या मशिनमध्ये मतदानाचा पूर्ण डाटा जशास तसा असल्याने मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही अडचण आली नाही त्यानंतर नवीन इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन मागवून पुन्हा मतदान सुरू करण्यात आले असे निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.