मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० एप्रिल २४ मंगळवार
सोमवारी पुण्यातील सभेत बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती असे ते म्हणाले.त्यांच्या या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.दोघांनीही एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र हे आमचे शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे म्हणूनच स्वतःचे आसन अस्थिर झाल्याचे लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली पण इथे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.तसेच ४ जूननंतर भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.रोहित पवारांबरोबरच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले असून प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो.माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते.जीवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही.नेमके मोदींना म्हणायचे तरी काय होते ? अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की,बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले त्यातही अशाच प्रकारचा उल्लेख होता.‘यांचे शेवटचे भाषण कधी होणार हेच कळत नाही असे ते म्हणाले होते.मोदीही असेच काही बोलून गेले.ते पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पाहत नाहीत ना ? पवारसाहेब यांना एवढे घाबरायचे कारण काय ? असा प्रश्नाही त्यांनी उपस्थित केला.अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोदींचे विधान पटते का ? याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे.मराठी माणसे ‘भटकता आत्मा’ कशाला म्हणतात हे मतदानात दाखवून देतील असेही ते म्हणाले.पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांचा अतृप्त आत्मा असा उल्लेख केला होता.आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मा असतात व त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही ते दुसऱ्याच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात.४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली.अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत.हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात,कुटुंबातही ते असेच करतात.१९९५ मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपाचे सरकार अस्थिर करु पाहात होता.२०१९ मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केले ते महाराष्ट्राला माहीत आहेच.आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या अतृप्त आत्म्याने सुरु केला आहे असे ते म्हणाले होते.