नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० एप्रिल २४ मंगळवार

बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून सोबत  चार राखीव खेळाडूंची निवड केली आहे तसेच रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे ज्यामध्ये २० संघ सहभागी होणार आहेत.रोहित शर्मा पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे त्याचबरोबर विराट कोहलीलाही या संघात स्थान मिळाले आहे.दुसरीकडे ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.डिसेंबर २०२२ मध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.त्याचबरोबर संजू सॅमसन, युजवेंद्र चहल,यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे हे खेळाडू प्रथमच आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.

टीम इंडियाचा भाग असलेले तीन मोठे चेहरे भारतीय संघातून वगळण्यात आले असून यामध्ये केएल राहुल शिवाय रिंकू सिंग आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे.मात्र बीसीसीआयने रिंकू आणि शुबमन यांचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश केला आहे.विशेष म्हणजे आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर रिंकूपेक्षा शिवम दुबेला प्राधान्य देण्यात आले आहे.हार्दिकची निवड झाल्यास शिवम-रिंकूपैकी एकालाच संधी मिळेल अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.त्याचवेळी यशस्वी आणि शुबमन या दोघांपैकी एकाला दिली जाणार होती.ज्यामध्ये निवडकर्त्यांनी शुबमन गिलपेक्षा यशस्वीला प्राधान्य दिले आहे.तसेच एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे श्रेयस अय्यर,इशान किशन आणि केएल राहुल या खेळाडूंना टी-२० विश्वचषकासाठी वगळण्यात आले आहे.आयपीएल २०२४ मध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर आपल्या कामगिरीने प्रभावित करु शकले नाही.याशिवाय या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही बाहेर ठेवण्यात आले आहे.

टी-२० विश्वचषक २०२४साठी भारताचा संघ पुढीलप्रमाणे आहे.

रोहित शर्मा,यशस्वी जैस्वाल,विराट कोहली,सूर्यकुमार यादव,ऋषभ पंत (विकेटकीपर),संजू सॅमसन (विकेटकीपर),हार्दिक पंड्या (उपकर्णधार),शिवम दुबे,रवींद्र जडेजा,अक्षर पटेल,कुलदीप यादव,युझवेंद्र चहल,अर्शदीप सिंग,जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज.राखीव खेळाडू : शुभमन गिल,रिंकू सिंग,खलील अहमद,आवेश खान.हा प्रोव्हिजिनल स्वरुपाचा संघ असून यामध्ये २५ मे पर्यंत प्रत्येक देशाला जाहीर केलेल्या संघात बदल करण्याची मुभा आहे.