“सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर”!! प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट !!
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ मे २४ गुरुवार
स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही अशी टीका करताना आता तर सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे केवळ बाकी असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.हे बडे प्रस्थ कोण यावर बोलणे त्यांनी टाळले. आता हे बडे प्रस्थ कोण यावर काथ्याकूट होणार असून अनेकजण संशयाच्या भोवऱ्यात असणार आहेत.सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे प्रमुख प्रशांत कदम यांच्या प्रचारसभेसाठी आलेले आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते.उमेदवार प्रशांत कदम,वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ,जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई,जिल्हा महासचिव शरद गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रकाश आंबेडकर यांनी एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सँडविच झालेल्या काँग्रेसला सहकार्याचा हाथ देवू अशी भूमिका मांडताना दूसरीकडे याच पक्षाला लक्ष्य केले.ते म्हणाले काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी बऱ्याच ठिकाणी तोडजोडीचे उमेदवार दिलेत.नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोलेंनी आनंद व्यक्त करण्याऐवजी नितीन गडकरींच्या पराभवबद्दल दुःख व्यक्त केले यावरून दोन्ही पक्षातील छुपा समझोता उघड झाला असून राज्यात काँग्रेस का लढू शकत नाही याची कारणेही समोर येऊ लागली आहेत.दुर्दैवाने स्थानिक पक्ष आता विरोधी पक्ष होत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात झालेल्या दोन टप्प्यांमधील मतदानात भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष जिंकण्याचा दावा करत नाहीत व त्यांचा संभ्रम वाढवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे.भारतीय जनता पक्षाचे ‘अबकी बार चारशेपार’ हे धोरण पूर्णपणे उध्वस्त होताना दिसते आहे व ते चारशेवरून तीनशे आणि आता दोनशेवर आल्याची परिस्थिती आहे.स्थानिक पक्षांनीच त्यांची हवा काढल्याचे सर्वेवरून दिसते असल्याची त्यांनी केली.मोदींच्या गॅरंटीची जनताच आता खिल्ली उडवत असून नोटबंदी,कर्जवाढ,बेरोजगारी,सरकारी मालमत्ता विकणे हीच मोदींची गॅरंटी असल्याचे लोक म्हणत आहेत.मोदींच्या या जुमल्यांना लोकांनी आणि स्थानिक पक्षांनी उध्वस्त करून टाकले आहे.पुण्यातील मोदींच्या सभेत ४० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या.बरेच लोक अर्ध्यातून उठून गेले यावरून २०१४ च्या निवडणुकीतील मोदींचा आता करिष्मा संपत चालला असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.सातारा जिल्ह्यात वंचितने माजी सैनिक उमेदवार दिला आहे.कराडच्या सभेत मोदी वीस मिनिटे सैनिकांवर बोलले त्यामुळे आमची ही उमेदवारी भक्कम झाली असून पंतप्रधानांनाही त्याची दखल घ्यावी लागली ही जमेची बाजू आहे.जिल्ह्यात चाळीस हजार माजी सैनिक आहेत त्यांनी प्रत्येकी दहा मते मिळवली तरी चित्र काय होऊ शकते ? हे दिसून येते असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी साताऱ्यातून वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा दावा केला.
सातारा लोकसभा मतदारसंघातील एका उमेदवारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत व त्यांना नोटिसाही बजावल्या गेल्या आहेत त्यांच्यावर यापूर्वी कारवाईही झाली होती या प्रश्नावर ते म्हणाले,लोकांसमोर आलेल्या चारित्र्यावर टिपणी कशाला करायची.ते शर्यतीत असते तर कदाचित आम्ही त्यांची दखल घेतली असती.पंतप्रधानांनी वंचितच्या उमेदवाराची दखल घेतली यावरून कोण पुढे आहे हे सिद्ध होते असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. सांगलीतून पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा दिला होता याप्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले,चंद्रहार पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा तुम्ही अपक्ष लढा.सर्व आखाड्यांचे संघटन करा. तर मी तुमच्या प्रचाराला येईल असे मी आश्वासन त्यांना दिले होते परंतु ते अपक्ष लढले नाहीत.ज्या सांगली जिल्ह्यात ज्यांची काहीच ताकद नाही अशा शिवसेनेबरोबर जाऊन त्यांनी आपल्या पायावर दगड मारून घेतला घेतल्याची टीका त्यांनी केली आहे.काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार विशाल पाटील यांना उमेदवारी डावलून भाजप व काँग्रेसचा इथेही छुपा अजेंडा असू शकतो का ? यावर ते म्हणाले,त्याची शक्यता नाकरता येत नाही कारण ‘कल्याण’मध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार हा खूप कमकुवत आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा सामना करू शकत नाही यावरून सर्वकाही स्पष्ट होते अशीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेसचा सँडविच केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असून ते ‘वंचित’बरोबर छुप्या पद्धतीने काम करत आहेत मात्र काँग्रेसची तयारी असेल तर विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी संदर्भात चर्चा करायला तयार आहोत असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलतांना केले आहे.