“मोदींच्या कुटुंबाची परिस्थिती चिंताजनक…” पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांवर टीका केली होती.पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत ते पक्ष काय सांभाळणार ? असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी आज उत्तर दिले असून माध्यमांशी संवाद साधत असतांना पवारांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले,मलाही मोदींबद्दल माहिती आहे त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले ? पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही.त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे पण असे व्यक्तिगत बोलू नये हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही पण मीही हे पथ्य पाळू नये ही भूमिका काही योग्य होणार नाही असे भाष्य शरद पवार यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या पण त्या अमलात आलेल्या नाहीत.पंतप्रधान बेछूटपणे काही गोष्टी सांगत असतात पण सरकारला ते करणे झेपेल की नाही ? सरकारची तशी स्थिती आहे की नाही ? याचा यत्किचिंतही विचार ते करत नाहीत म्हणून पंतप्रधान मोदींबद्दलची आस्था कमी होत आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.डॉ.मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर मोदींनी टीका-टिप्पणी केली होती पण आज तेच निर्णय मोदी राबवत आहेत.त्यांचातला हा विरोधाभास लोकांना दिसत आहे.लोक आता डॉ.मनमोहन सिंग यांची दहा वर्ष आणि मोदींच्या दहा वर्षांची तुलना करत आहेत.डॉ.मनमोहन सिंग यांचे वैशिष्ट होते की ते कोणताही गाजावाजा न करता शांतपणे काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे.मोदी साहेबांचा रिझल्ट माहीत नाही पण टीका-टिप्पणीतच त्यांचा फार वेळ जातो.लोकांना आता हे सर्व कळायला लागले आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.