Just another WordPress site

“माझ्यासाठी भावुक क्षण” रायबरेलीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधींची आईबाबतची पोस्ट चर्चेत

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.४ मे २४ शनिवार

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काल दि.३ मे रोजी सकाळी उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या लोकसभेच्या दोन पारंपरिक जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली व पाठोपाठ दोन्ही उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून किशोरीलाल शर्मा याना लोकसभेचे तिकीट दिले आहे.अमेठी आणि रायबरेलीमध्ये येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.या दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसच्या उमेदवारांनी मुदत संपण्याच्या काही वेळ आधी त्यांचे अर्ज दाखल केले आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती.या जागेवरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी निवडून आल्या होत्या तर काँग्रेसचा दुसरा सर्वात मोठा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघात भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना पराभूत केले होते.राहुल गांधी यांनी यंदा अमेठीतून निवडणूक लढणे टाळले आहे तर पक्षाने त्यांना निवडणूक जिंकणे सोपे असलेल्या रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे.निवडणुकीचे तिकीट जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.

देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून रायबरेली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, त्यांचे पती फिरोज गांधी,नेहरू परिवारातील अरुण नेहरू,शीला कौल आणि २००४ पासून सोनिया गांधी या रायबरेलीच्या खासदार राहिल्या आहेत मात्र यंदा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे तर रायबरेलीतून पक्षाने राहुल गांधी यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.दरम्यान ज्या मतदारसंघातून आई सोनिया गांधी गेल्या २० वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढवत आली आहे त्याच मतदारसंघातून यंदा उमेदवारी अर्ज भरतांना राहुल गांधी भावुक झाले होते.राहुल यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, रायबरेलीतून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणे हा माझ्यासाठी खूप भावुक क्षण होता.माझ्या आईने आमच्या कुटुंबाची कर्मभूमी मोठ्या विश्वासाने माझ्याकडे सोपवली आहे आणि रायबरेलीतील लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे.अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ माझ्यासाठी वेगवेगळे नाहीत.दोन्ही मतदारसंघ मला माझ्या कुटुंबासारखेच आहेत.मला आनंद वाटतो की गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसची सेवा करणाऱ्या किशोरीलाल शर्मा यांना यंदा अमेठीतून लोकसभेचे तिकीट मिळाले आहे.अन्यायाविरुद्ध चालू असलेल्या न्यायाच्या या युद्धात मी माझ्या जवळच्या लोकांकडून केवळ प्रेम आणि आशीर्वाद मागतोय.मला विश्वास आहे की संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर उभे आहात असे राहुल गांधी यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.