Just another WordPress site

गुजरातमधील तीन गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार !! तीन गावांमध्ये शून्य टक्के मतदान !!

गुजरात-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.८ एप्रिल २४ बुधवार

लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत असून यापैकी तीन टप्पे पार पडले असून तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान झाले.दरम्यान तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्यात ९३ जागांसाठी मतदान झाले असून यामध्ये महाराष्ट्रात ११ आणि गुजरातमध्ये २५ जागांसाठी हे मतदान झाले आहे.मात्र गुजरातमधील तीन गावांमध्ये शून्य टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली असून या तीनही गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली त्यामुळे दिवसभर एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.गुजरातमध्ये लोकसभेच्या २५ जागांसाठी काल मंगळवारी मतदान झाले.मात्र यानंतर गुजरातमधील तीन गावे चर्चेत आले आहेत.यामध्ये भरूच जिल्ह्यातील केसर गाव, सुरत जिल्ह्यातील संधारा आणि बनासकांठा जिल्ह्यातील भाकरी गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.त्याचबरोबर जुनागड जिल्ह्यातील भटगाम गाव आणि महिसागर जिल्ह्यातील बोडोली आणि कुंजरा गावातील मतदारांनीही काही प्रमाणात मतदानावर बहिष्कार टाकला व त्यामुळे तेथेही अत्यल्प मतदान झाले आहे.

दरम्यान केसर गाव,संधारा व भाकरी या तीन गावातील एकाही नागरिकाने मतदान केले नाही.सदरील तीन गावामध्ये मिळून जवळपास एक हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत मात्र एकही मतदार मतदान केंद्राकडे न फिरकल्यामुळे दिवसभर मतदान केंद्र ओस पडल्याचे पाहायला मिळाले.यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदान करण्यासाठी आवाहन केले होते पण त्यानंतरही येथील मतदार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.या तीनही गावातील लोकांचे म्हणणे आहे की सरकारकडून आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे विकासकामे नाही तर मतदान नाही अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतली आहे.भाजपाचे उमेदवार भरतसिंह डाभी यांनीही या गावात पोहोचून लोकांना मतदान करण्याची विनंती केली पण तरीही लोकांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही या मतदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी ७ मे रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी अंदाजे ६२.२७ टक्के इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.