छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ मे २४ बुधवार
मतदान प्रक्रियेत ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने शिवसेनेचे (यूबीटी) नेते अंबादास दानवे यांच्याकडून अडीच कोटी रुपयांची मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरात एका लष्करी जवानाला पोलिसांनी अटक केली आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.मारुती ढाकणे वय ४२ या आरोपीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.आरोपीच्या डोक्यावर कर्ज होते व हे कर्ज फेडण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली आहे पण त्याला ईव्हीएमबद्दल काहीच माहिती नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.काल मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपीने अंबादास दानवे यांचे धाकटे भाऊ राजेंद्र दानवे यांची जवळच्या हॉटेलमध्ये भेट घेतली.अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याठिकाणी झालेल्या चर्चेनंतर दीड कोटी रुपयांचा करार झाला होता व त्याने राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन रक्कम म्हणून १ लाख रुपये घेतले आहे असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आरोपीच्या डोक्यावर कर्ज आहे व कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्याने ही युक्ती केली असून त्याला मशीन (EVM) बद्दल काहीच माहिती नाही. तो चीटर असून आम्ही त्याला अटक केली आहे.येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.सदर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि ५११ (गुन्हा करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील आरोपी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी असून तो जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे तैनात आहे.