दि.८ मे २४ बुधवार
राम मंदिर उभारणीत नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या आधारावर काम केले असून आम्ही ते सुधारून धर्माच्या आधारावर काम करू तसेच अयोध्येत राम दरबार उभारु असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे.धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले धुळे दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला.दरम्यान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजना आणि राम मंदिर काँग्रेस काढून घेणार असल्याच्या आरोपावर पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले,भाजपची स्वत:ची कोणतीही योजना नाही,मोफत अन्नधान्य देणार ही आमचीच योजना आहे.उलट आम्ही या योजनेत गोरगरिबांना खायचे तेल,साखर,डाळ देऊन योजना वाढवणार तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला देखील काम देऊ असे त्यांनी नमूद केले आहे.
राम मंदिराबाबत केलेल्या आरोपावर नाना पटोले पलटवार करत म्हणाले की,काँग्रेसची सत्ता आल्यावर राम मंदिराचे आम्ही शुद्धीकरण करणार आहोत.हिंदू धर्मातील श्रेष्ठ असलेल्या या चारही शंकराचार्यांच्या हातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल आणि अयोध्येत राम दरबार स्थापन केला जाईल.राम मंदिर उभारण्यात नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या आधारावर काम केले असून आम्ही हे सुधारून धर्माच्या आधारावर काम करू.शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या केलेल्या भाकीतावर देखील नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपाच्या तानाशाह वृत्तीचा परिणाम जाणवत आहे.काँग्रेसच आता देशासाठी पर्याय आहे.अनेक पक्ष यायला सुरुवात झाली आहे त्याच्याच आधारावर शरद पवारांनी असे वक्तव्य केले असल्याचे नाना पटोलेंनी यावेळी म्हटले आहे.