पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.९ मे २४ गुरुवार
उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगातून आज दि.९ मे गुरुवार रोजी वर्धा आणि अमरावतीमध्ये गारपीट होण्याचा अंदाज असल्याबाबत हवामान विभागाने या दोन जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,राजस्थान आणि गुजरातमधील काही ठिकाणांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे.राजस्थान आणि गुजरातमधून उत्तरेकडून उष्ण वारे राज्यात येत आहे तसेच बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारेही मध्य भारत आणि विदर्भाकडे येत आहे.या उष्ण आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगातून उंच ढगाची निर्मिती होऊन विदर्भात गारपीट होणार असून आज गुरुवार रोजी वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत गारपीट होण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पूर्व विदर्भ आणि सलग्न मराठवाड्यात पुढील चार-पाच दिवस मेघर्गजना,विजांचा कडकडाट,वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे.विदर्भात मंगळवार रोजी ६० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहिले.तर आज गुरुवार रोजीही वादळी वारे वाहण्याचा अंदाज असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.दरम्यान राज्यात मंगळवारी मालेगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.त्या खालोखाल जळगाव ४२.४,सोलापूर ४१.६,उस्मानाबाद ४०.१,औरंगाबाद ४०.२,परभणी ४१.३,नांदेड ४०.६,बीड ४०.७,अकोला ४२.५,अमरावती ४०.६,बुलढाणा ४०.४,वाशिम ४२.६,वर्धा ४१.० आणि यवतमाळमध्ये ४०.५ अंशांवर पारा होता.विदर्भात ढगाळ हवामान,पाऊस आणि गारपिटीमुळे कमाल तापमान सरासरी दोन अंशांनी कमी झाले आहे.किनारपट्टीवर पारा सरासरी ३४ अंशांवर होता. यात मुंबई ३४.३,सांताक्रुज ३३.६,अलिबाग ३४.७,रत्नागिरी ३४.० आणि डहाणूत ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.