मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० मे २४ शुक्रवार
शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरून भाजपाकडून आक्रमक पवित्रा अवलंबण्यात येत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहे यावर आज माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली.मी कुणालाही औरंगजेब म्हणालो नाही.मी औरंगजेबी विकृतीवर बोललो होतो तसेच जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू हे कुणाला व्यक्तिगत बोललेलो नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर चाल करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलेले आहे हा इतिहास आहे.इतिहासात अफजल खान,शाहिस्तेखान असेल किंवा औरंगजेब असेल.ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले त्यांना इथे गाडले गेले यात काही चुकीचे नाही त्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
बुधवारी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता. याचाही समाचार संजय राऊत यांनी घेतला.ते म्हणाले,उद्धव ठाकरेंना जर नकली संतान कुणी बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो व या दोघांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे तसेच हा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांचा नसून हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना माननाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. तेलंगणात जाऊन उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.