Just another WordPress site

“फडणवीसांनी अजित पवारांसारखा भ्रष्टाचार करण्यासाठी मला खाते (मंत्रीपद) दिले नव्हते” माजी खासदार उन्मेश पाटलांचा टोला

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१० मे २४ शुक्रवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला अजित पवारांसारखा भ्रष्टाचार करायला खाते (मंत्रीपद) दिले नव्हते असे वक्तव्य जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.तसेच फडणवीसांनी त्यांच्या जवळच्या चेलेचपाट्यांना सांभाळावे असा सल्ला देखील उन्मेश पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे.उन्मेश पाटील म्हणाले,देवेंद्र फडणवीस यांच्या चेलेचपाट्यांमुळे खानदेशाचे मोठे नुकसान होत आहे.हे वक्तव्य करत असतांना पाटील यांचा रोख मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होता का ? असे बोलले जात आहे.उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे.तसेच मला तुरुंगात टाकून जर प्रश्न सुटत असतील तर मी आनंदाने तुरुंगात जायला तयार आहे असेही पाटील म्हणाले.महायुतीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील (शिवसेना ठाकरे गट) यांच्या प्रचारार्थ उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव येथे मशाल रॅलीचे आयोजन केले होते.या रॅलीदरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी पाटील म्हणाले,आमच्या या मशाल रॅलीच्या माध्यमातून खानदेशात आता क्रांती सुरू झाली आहे.

दरम्यान उन्मेश पाटील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवरही उत्तर दिले असून आम्ही उन्मेश पाटील यांचा तिकीट कापून त्यांना वाचवले असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केले होते यावर उन्मेश पाटील यांनी आज प्रतिक्रिया दिली.पाटील म्हणाले,मला असे  वाटते की फडणवीस यांनी अजित पवारांसारखे मला भ्रष्टाचार करायला एखादे खाते दिले नव्हते किंवा फडणवीसांनी मला वाचवायला मी काही अशोक चव्हाणांसारखा मुख्यमंत्री देखील नव्हतो.त्याउलट देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जवळच्या चेलेचपाट्यांना सांभाळावे,तपासावे आणि खात्री करून घ्यावी.तसेच मला तुरुंगात टाकून प्रश्न सुटत असतील तर मला याचा आनंदच आहे.उन्मेश पाटील यांनी यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देखील इशारा दिला आहे.पाटील म्हणाले,गिरीश महाजन यांनी जे काही चालवले आहे ते आता बंद करायला हवे. खानदेशातील लोक आता त्यांच्या राजकारणाला कंटाळले आहेत.महाजन यांनी त्यांचे राजकारण बदलावे.लोक विकासाची अपेक्षा करत आहेत,घाणेरड्या राजकारणाची नव्हे असे उन्मेश पाटील यांनी म्हटले आहे.जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी गेल्या महिन्यात ३ एप्रिल अधिकृतपणे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.पाटील गेल्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर जळगावातून लोकसभा निवडणूक जिंकले होते मात्र भाजपाने यंदा त्यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.उन्मेश पाटील आता जळगावात करण पवार यांचा प्रचार करत आहेत तसेच आगामी विधानसभेसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.