मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० मे २४ शुक्रवार
मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील सिव्हिल लाईन हद्दीतून दि.६ मे सोमवार रोजी एका सहा महिन्याच्या बाळाचे पदपथावरून अपहरण झाले होते व या बाळाला सहा जणांनी कल्याण मधील शहाड येथे पळून नेले असल्याची माहिती मिळविल्यावर मध्यप्रदेश पोलीस आणि कल्याण पोलिसांनी संयुक्त कारवाई करून शहाड येथून अपहरणकर्ते आरोपींना अटक केली आहे.या आरोपींच्या माध्यमातून पनवेल येथून अपहृ्त बालकाची एका इसमाच्या ताब्यातून सुटका करून त्याचा ताबा घेतला असून याप्रकरणात एक शिक्षक,त्याची पत्नी आणि एक माजी विद्यार्थी आणि दोन संशयित महिलांना पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी दिली आहे.या बाळाची २३ लाखाला विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील सिव्हील लाईन भागात एक फिरस्ते दाम्पत्य आपल्या सहा महिन्याच्या बाळासह पदपथावर रात्रीच्या वेळेत झोपले होते.सकाळी उठल्यानंतर या दाम्पत्याला आपले बाळ जागेवर नसल्याचे दिसले.त्याचा शोध घेण्यात आला पण ते कोठेच आढळले नाही.सिव्हील लाईन भागातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मध्यप्रदेश पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रकरणाचा शोध सुरू केला त्यावेळी बाळाला कल्याणमधील शहाड भागात राहत असलेल्या एका टोळक्याने पळून नेले असल्याचे पोलिसांना समजले.कल्याण आणि मध्यप्रदेश पोलिसांनी शहाड येथील संबंधित ठिकाण शोधून काढले व तेथून अपहरण करणऱ्या आरोपींना अटक करण्यात आली.अपहृत सहा महिन्याचे बाळ पनवेल मधील सिडको सेक्टर १४ येथे एका इसमा सोबत असल्याची माहिती आरोपींकडून पोलिसांना मिळाली.पोलिसांनी पनवेलला जाऊन पहिले बाळाचा ताबा घेऊन बाळाचा ताबा असलेल्या संशयित इसमाला ताब्यात घेतले.आठ तासात पोलिसांनी हा संवेदनशील गुन्हा उघडकीला आणला असून याप्रकरणात पोलिसांनी एक शिक्षक,त्याची पत्नी,त्यांचा माजी विद्यार्थी,दोन संशयित महिलांना अटक केली आहे.आरोपींसह बाळाला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे असे उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले.या बाळाचे अपहरण करण्यामागील आरोपींचा उद्देश काय होता ? त्याची कोठे विक्री केली होती ? याचा तपास मध्यप्रदेश पोलिसांंनी सुरू केला आहे.याप्रकरणात खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे,पोलीस निरीक्षक शिवले,साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड,हवालदार राजू लोखंडे,सुधीर पाटील अशा दोन पथकांनी ही अटकेची कारवाई केली आहे.