बैल पोळा साध्या पद्धतीने गोठ्यातच साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जनावरांवरील लम्पि स्क्रीन आजारामुळे खबरदारी म्हणून उपाय
जळगाव -पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी बैलपोळा हा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता सध्या पद्धतीने गोठ्यातच साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जिल्हयात गाय,म्हैस,बैल या जनावरांमध्ये लम्पि स्क्रीन आजाराची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे.सदरहू लम्पि स्क्रीन या संसर्गजन्य आजारापासून इतर जनावरांना बाधा होणार नाही याची खबरदारी घेऊन आपापल्या जनावरांचे संरक्षण व्हावे याकरिता जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी बैलपोळा हा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता सध्या पद्धतीने गोठ्यातच साजरा करण्यात यावा तसेच सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यात येणारा पोळा फोडण्याचा कार्यक्रम संपुर्ण रद्द करण्यात यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
तसेच जिल्ह्याभरामध्ये जनावरांवरील लम्पि स्क्रीन आजाराने शेतकरी पशुपालक हवालदिल झालेले असतांना ज्या गाय,बैल,म्हैस या जनावरांना आजाराची लागण झाल्याचे आढळून आल्यास त्या जनावरांना तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या गुरांना घेऊन जाऊन त्यांच्यावर औषधोपचार करून घ्यावे.लम्पि स्क्रीन हा आजार संसर्गजन्य असला तरी हा आजार ८ ते १० दिवसात बरा होतो त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता औषधोपचार करून घ्यावा.त्याच बरोबर गोठा व गुरांची स्वच्छता व रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.