मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ मे २४ शनिवार
नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे भाजपसह सर्वच पक्ष संभ्रमात पडले आहेत.मोदींच्या वक्तव्याचे सर्वपक्षीय पडसाद उमटले असून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.नंदुरबार येथे भाजप उमेदवार डॉ.हीना गावित यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली त्यावेळी त्यांनी,‘‘नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी मनाची तयारी केली आहे पण ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छाती फुगवून आमच्याकडे यावे’’ असे आवाहन केले.मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहाही शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उल्लेख वारंवार ‘नकली सेना’ असा करीत आहेत. तेलंगणातील एका सभेत तर मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख बाळासाहेबांची ‘नकली संतान’ असा केला होता.पवार आणि ठाकरे यांनी ‘रालोआ’मध्ये सामील व्हावे या मोदींच्या नंदुरबारमधील प्रस्तावाचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी,‘‘आम्ही नेहरू-गांधी यांची विचारसरणी मानणारे आहोत.नेहरू-गांधींची विचारधारा देशाला एकत्रित ठेवणारी आणि ऐक्याची आहे. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशातील संसदीय लोकशाही संकटात आली आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही’’ तसेच पंतप्रधानपद हे घटनात्मक असल्याने त्या पदावरील व्यक्तीने जाहीर वक्तव्ये करतांना तारतम्य बाळगले पाहिजे.आक्षेपार्ह विधाने टाळली पाहिजेत असेही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र मोदींच्या प्रस्तावाचे समर्थन केले असून ‘‘काँग्रेसकडे जाण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचाराच्या पक्षाकडे येणे कधीही चांगले,’’अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली आहे.जेव्हा एखाद्या पक्षाची ताकद कमी होते तेव्हा विलिनीकरणाची चर्चा होते.ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांची ताकद कमी झाल्याने ते काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा करू लागले आहेत.ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये पूर्वीच विलीन झाला आहे फक्त विलिनीकरण शब्द लावायचा आहे त्यांचे काँग्रेसीकरण झाले आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.मोदी यांच्या आवाहनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘पंतप्रधानांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रालोआबरोबर येण्याचा प्रस्तावच दिलेला नाही.लोकसभा निवडणुकीनंतर छोटय़ा पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल या पवार यांच्या वक्तव्यावर मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.मोदी यांचे विधान स्वयंस्पष्ट आहे.बारामतीच्या जागेवर पराभव होणार हे पवार यांच्या लक्षात आले आहे त्यामुळेच छोटय़ा पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल असे वक्तव्य पवार यांनी नैराश्यातून केले आहे.निवडणूक निकालानंतर त्यांची निराशा होणार आहे पण काँग्रेसलाही भवितव्य राहणार नसल्याने पवार आणि ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन व्हावे असा सल्ला मोदी यांनी दिला आहे.