देशातील जनतेचा कल इंडिया आघाडीच्या बाजूने दिसत असल्याचेही केजरीवाल म्हणाले.तुरुंगातून सुटल्यानंतर गेल्या २० तासांत मी निवडणूक तज्ज्ञ व जनतेशी चर्चा केली आणि मला कळले की भाजपचे सरकार येणार नाही.‘इंडिया आघाडी’ सत्तेत येणार असून आम आदमी पक्ष सरकारमध्ये सामील असेल.आम्ही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देऊ असे केजरीवाल यांनी सांगितले.केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.‘‘हुकूमशाही लादण्यासाठी मोदी ‘एक राष्ट्र, एक नेता’ मोहीम राबवत असून विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना तुरुंगात टाकून राजकीय विरोध संपुष्टात आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत’’ अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन,राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आदी नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.तसेच भाजप सत्तेत आल्यास दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीही बदलला जाईल असे भाकीतही अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.