पुण्यात सुबोध भावे,सोनाली कुलकर्णी,आर्या आंबेकर,सलील कुलकर्णी आदी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपल्या नावे बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे.सेंट मिरा शाळेतील मतदानकेंद्रावर पोहोचल्यानंतर माझ्या नावे आधीच मतदान झाल्याचे लक्षात आले व माझ्या नावापुढे दुसऱ्याच कुणीतही स्वाक्षरी केली होती असा दावा अरविंद शिंदे यांनी केला आहे.त्यानंतर आवश्यक अर्ज भरल्यानंतर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली असून याबाबत ऑनलाईन तक्रारही दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९६ मतदारसंघांत पाच वाजेपर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाले.आंध्र प्रदेश आणि बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या असून जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांत कमी ३५.७५ टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७५.६६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ जागांसह विधानसभेच्या १७५ जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले आहे.मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नंदुरबार-६०.६०% जालना  ५८.८५% बीड ५८.२१% रावेर ५५.३६% छत्रपती संभाजीनगर ५४.०२% अहमदनगर ५३.२७% शिर्डी  ५२.२७% जळगाव  ५१.९८% मावळ ४६.०३% पुणे ४४.९०% शिरूर ४३.८९ असे मतदान झालेले आहे.