आपला पराभव समोर दिसू लागल्याने भाजपाला सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही धोक्यात आणायची आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.तसेच निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून घटनात्मक जबाबदारी विसरू नये अन्यथा इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात येईल की भविष्यात कोणीही ‘संविधानाच्या शपथेचा’ अवमान करण्यापूर्वी १० वेळा विचार करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी दोन मिनिटांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता.या व्हिडीओ मध्ये एक तरुण भाजपाचे उमेदवार मुकेश राजपुत यांना चक्क आठ वेळा मतदान करताना दिसत होता.या व्हिडीओची पुष्टी होऊ शकली नसली तरी हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.दरम्यान इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून या तरुणाला अटक करण्यात आली असून राजन सिंग असे या तरुणाचे नाव आल्याचे समोर आले आहे.